
पोलिसांकडून पाच जणांना अटक
पुणे | ५ ऑगस्ट २०२५ – उत्तमनगर परिसरात अवैध गावठी पिस्तुल हाताळताना चुकून झालेल्या गोळीबारात एक तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली असून,खोटा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.
घटना कशी घडली?
दि. ४ ऑगस्ट रोजी सागर प्रदीप कोठारी (रा. इस्कॉन मंदिराजवळ, उत्तमनगर) व पार्श्वनाथ शिरीष चकोते (रा. भवानी माता कॉम्पलेक्स, उत्तमनगर) यांनी बेकायदेशीर गावठी पिस्तुल जवळ बाळगले होते. हे पिस्तुल बेदरकारपणे हाताळल्यामुळे गोळी सुटून ती थेट संकेत संजय मोहिते (वय २०) याच्या उजव्या पायाच्या नडगीवर लागली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
खोटा बनाव उघडकीस
गोळीबार झाल्यानंतर आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील एका १७ वर्ष ११ महिन्यांच्या अल्पवयीन मुलावर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस उपनिरीक्षक मुकेश कुरेवाड व अतुल क्षीरसागर यांच्या तपासात हा बनाव उघड झाला. जखमी संकेत व त्याचे मित्रांनी पोलिसांना चुकीची माहिती देत हकीकत व ठिकाण लपवण्याचा प्रयत्न केला होता.
अटक व गुन्हा नोंद
तपासानंतर पोलिसांनी खालील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
- संकेत संजय मोहिते (वय २०)
- सागर प्रदीप कोठारी (वय २२)
- पार्श्वनाथ शिरीष चकोते (वय २५)
- जाफर सादिक अली शेख (वय २०)
- वैभव लक्ष्मण धावडे (वय २२)
या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125(ब), 217, 3(5), भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 3(25), 3(27) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस कारवाई
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ३) श्री. संभाजी कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड श्री. भाऊसाहेब पटारे व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड श्री. अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे, पो.नि. धेंडे (वारजे), पो.उ.नि. मुकेश कुरेवाड, अतुल क्षीरसागर, राजनारायण देशमुख, पोलीस अंमलदार गणेश हजारे, प्रदीप शेलार, परमेश्वर पाडळे, अजय पवार यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.