उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताहाचा शुभारंभ

Photo of author

By Sandhya

महसूल विभागाने लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतीमान पद्धतीने कामे करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १: केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात येत असून महसूल विभागाने लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतीमान पद्धतीने विकासकामे वेळेत मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

विभागीय आयुक्तालय येथे महसूल सप्ताहाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे, बापुसाहेब पठारे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देवून श्री. पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून महसूल विभाग हा महत्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो. हा विभाग प्रशासनाचा कणा म्हणून कार्यरत आहे. अतिवृष्टी, पुरपरिस्थिती, नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल विभाग नागरिकांना दिलासा देण्याचे काम करीत असतो. इतर विभागांनाही सोबत घेवून लोककल्याणकारी योजना, ध्येयधोरणे, उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावी करण्यासोबतच प्रशासकीय गतिमानता आण्याकरिता महसूल विभागाने काम करावे. कोरोनाच्या काळात महसूल विभागाने आणि इतर सर्व सबंधित विभागाने उत्तम कामे करुन संकटाशी सामना केला, यांची नोंद नागरिकांनी घेतलेली आहे, असेही ते म्हणाले.

राज्यशासनाच्यावतीने नागरिकांना पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्यात येत आहे. गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत महसूल विभागाशी नागरिकांशी दैनंदिन संबंध येत असतो. त्यामुळे आपण कोणत्याही प्रबोलनास बळी न पडता नागरिकांना गुणवत्तापूर्ण, पारदर्शक सेवा द्यावी, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक द्यावी. चांगले काम करुन महसूल विभागासह राज्य शासनाप्रती नागरिकाच्या मनात उंचविण्याचे काम केले पाहिजे. आगामी काळात नागरिकांना अधिकाधिक ऑनलाईन सेवा देण्यावर भर देण्यात येणार येणार असून नागरिकांनाही या सेवांचा लाभ घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सर्व विभागांच्या सहभागाने महसूल सप्ताह यशस्वी करा

महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत. महसूल सप्ताहामध्ये सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले कामे करावे. राज्य शासनाच्यावतीने १०० दिवसाचा कृती कार्यक्रम राबविण्यात आला, आता १५० दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे, यामध्ये उत्सूर्फपणे सहभाग होवून कामे करावीत, असेही श्री.पवार म्हणाले.

शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा

महसूल विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन झाल्या आहेत, नागरिकांना या सेवांचा प्रभावीपणे, पारदर्शकरित्या लाभ देण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजात ई-प्रणाली, एआयचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. आपल्या पदाचा लोककल्याणाकरिता उपयोग झाला पाहिजे, अशी भावना ठेवून जबाबदारीपूर्वक कामे केली पाहिजे. नागरिकांची कामे कायद्याच्या चौकटीत बसवून ही कामे वेळेत होवून त्यांचा वेळ व खर्च वाचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामांचे अनुकरण करावे

राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम राबविल्याबद्दल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे, इतरांनी त्यांच्या कामाचे अनुकरण करुन आपल्या दैनंदिन कामकाजात समावेश केला पाहिजे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कपणे उभे राहिले पाहिजे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी करण्याकरिता संबंधित विभागाचे मंत्री, सचिवांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा म्हणून कार्यरत आहे. पुणे विभाग हा प्रगत, प्रगल्भ आणि विकसित विभाग आहे, येथील नागरिक सजग आहेत, लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी अभ्यासू आणि कार्यक्षम आहेत, त्यामुळे समाजाच्या अपेक्षापूर्ण करण्याकरिता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमूख, सदैव तत्पर राहून पारदर्शकरित्या कार्यक्षमतेने काम केले पाहिजे. सामान्य नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजून त्या सोडविण्याकरिता काम केले पाहिजे. माजी सैनिकांची कामे मार्गी प्राधान्याने मार्गी लावण्याच्यादृष्टीने कामे करावे.

महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन आयोजित करण्यात येतो. सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांना महसुली सेवा अधिक प्रभावीपणे देण्याकरिता संकल्प करण्याचा हा दिवस आहे. येत्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील. महसूल सप्ताहामध्ये नागरिकांना सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी केले.

श्री. डुडी म्हणाले, महसूल विभागाच्यावतीने नागरिकांना ऑनलाईन सेवा देण्यावर भर देण्यात येत आहे. येत्या काळात मंडळ अधिकारी कार्यालय बळकटीकरणाच्यादृष्टीने नवीन कार्यालय, ई-ऑफिस प्रणालीकरिता संगणक, प्रिंटर आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने स्वामित्व उपक्रमाअंतर्गत प्रॉपट्री कार्ड उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सुमारे ९०० किमी.चे रस्ते पाणंद रस्ते खुले करुन ३५ हजार नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. येत्या काळात पाणंद रस्त्याकरिता ‘जीआयएस’चा वापर करण्यात येणार आहे. लोकअदालतीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला पाहिजे. मंडळ अधिकाऱ्यांनी सेतू केंद्राचे सक्षमीकरण करण्याचे प्रयत्न करावे, जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती प्रसार माध्यमाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असेही श्री. डुडी म्हणाले.

श्री.पवार यांच्या हस्ते विभाग आणि जिल्हास्तरीय उत्कृष्ट काम करणाऱ्या तसेच विविध खेळात प्राविण्य मिळालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी तर आभार प्रदर्शन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.

यावेळी महसूल विभागाच्या कामकाज आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली.

कार्यक्रमापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्री. पवार यांनी विनम्र अभिवादन केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page