
बारामती, दि. 13: उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी साखर कारखान्यांच्या गाळप हंगामादरम्यान उस वाहतूक करतांना होणारे अपघात रोखण्यासाठी आवश्यक करावयाच्या उपायोजनांबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे बुधवारी (दि. 12 नोव्हेंबर )बैठक घेवून सूचना केल्या.
या बैठकीस सहायक मोटार वाहन निरीक्षक सुरज पाटील, तसेच कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व साखर कारखान्यांचे शेतकी अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. निकम यांनी ट्रॅक्टरव्दारे व इतर वाहनातून ऊसाची वाहतूक करतांना अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उसाची वाहतूक करतांना वाहनांची सर्व वैध कागदपत्रे संबंधित वाहनचालकाने सोबत ठेवावीत. वाहनाच्या पाठीमागच्या भागास रिफ्लेक्टिव्ह टेप व पट्टी असणारे लाल रंगाचे कापड लावावेत. वाहनचालकांनी वेगमर्यादांचे पालन करण्यासह वाहतुक सुरक्षितेच्या सर्व नियमांचेही पालन करावे. वाहतूक करतांना वाहनचालकांने मद्यप्रशासन करु नये. वाहनामध्ये मोठ्या आवाजाने ध्वनिक्षेपक (स्पीकर) लावू नये, अशा सूचना श्री. निकम यांनी दिल्या.
संबंधित साखर कारखान्यानी वाहतूक व रस्ते सुरक्षाविषयक नियमांच्या सर्व बाबींची प्रवेशद्वारावरच तपासणी करावी. संचालक मंडळांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे रस्ता सुरक्षिततेच्या व वाहतुकीदरम्यान घ्यावयाची काळजी, उपाययोजनांबाबत प्रबोधनात्मक शिबीराचे आयोजन करुन वाहनचालकाना मार्गदर्शन करावे,असेही श्री. निकम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.