
मलकापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात झाला. अचानक ब्रेक मारल्यामुळे एका कंटेनरला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या कंटेनरची धडक झाली. या अपघातात पाठीमागील कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला.
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर साताऱ्याच्या दिशेने जात होता. अचानक या कंटेनरच्या चालकाने ब्रेक लावल्यावर, सातारा दिशेने येणाऱ्या दुसऱ्या कंटेनर (नंबर प्लेट केए ५४ एजे ५०१०)ने त्याला पाठीमागून धडक दिली. या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, महादेव लावंड यांच्यासह कर्मचारी त्वरित अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताची तक्रार कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस उपनिरीक्षक भोईटे आणि कोळी तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमी चालकाला त्वरित रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.