
पर्यावरण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडेंना पत्र
कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची पत्रात मागणी
पुणे – राज्यात ऊद्यापासून गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. अश्यातच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकाराने फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी आरास व मखर तयार करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर फुलांचा वापर केला जातो. मात्र, शेतकऱ्यांनी शेतात पिकविल्या नैसर्गिक फुलांऐवजी चीन मधून आयात केलेल्या प्लास्टिक अथवा सिंथेटिक पदार्थांपासून बनवलेली कृत्रिम फुले मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. हा वापर शेतकऱ्यांच्या आर्थिक ऊत्पन्नावर विपरीत परिणाम करणारा तर आहेच, परन्तु पर्यावरणालाही हानीकारक आहे.
आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकाराने पर्यावरण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडेंना यासंदर्भात पत्र देत कृत्रिम फुलांच्या वापरामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी, शेतकरी हितास्तव पर्यावरण विभागामार्फत आवश्यक कायदेशीर उपाययोजना करत कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली.
कृत्रिम फुलांच्या वापरामुळे फुल शेती धोक्यात येऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे तसेच हरीतगृहे नष्ट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. आजच्या काळात विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कृत्रिम (प्लास्टिक/सिंथेटिक) फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे फुले दिसायला आकर्षक असली, तरी त्यांचा पर्यावरणावर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेत पंकजा मुंडेंना पत्र लिहित कृत्रिम फुलांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली.