
पानटपरीच्या पाठीमागे झाडाच्या आडोशाला पंचेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा ९३२ ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीररित्या साठा करून त्याची विनापरवाना विक्री केल्याप्रकरणी येथील एका एकोणीस वर्षीय तरुणावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकणचे पोलीस हवालदार भैरोबा मनोहर यादव (वय – ४२, रा. चाकण.) यांनी याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, येथील पोलिसांनी वैभव संजय शिंदे (वय – १९, रा. सदगुरू कॉम्प्लेक्स, चाकण.) याच्यावर गु.र.नं.११४०/२०२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वैभव हा कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता चाकण गावच्या हद्दीतील चक्रेश्वर मंदिराच्या कमानीजवळ असलेल्या एका पानटपरीच्या पाठीमागे झाडाच्या आडोशाला विक्रीसाठी गांजाचा साठा करून ठेवत होता. याची कुणकुण चाकण पोलिसांना त्यांच्या एका गुप्त खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर चाकण पोलिसांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान संबंधित ठिकाणी धाव घेऊन छापा मारला. त्यावेळी पोलिसांना वैभव हा विनापरवाना गांजाचा साठा करून त्याची परस्पर विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी यावेळी वैभव याच्याकडून ४५,५०० रुपये किमतीचा ९३२ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला.
चाकण उत्तर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राम डगळे, भैरोबा यादव, तानाजी कदम, संगीता कदम आदी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.