




पुणे, दि. १२ जून : मुंबई-बेंगळूर महामार्गावरील बावधन येथील चांदणी चौकात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास कंटेनर ट्रेलरला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कंटेनर ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, कंटेनर ट्रेलर साताऱ्याकडे निघाला असताना समोर अचानक एक वाहन आल्यामुळे चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे ट्रेलरमधील लोखंडी पाईप्स (सळया) पुढे सरकत केबिनमध्ये घुसल्या आणि चालकाला गंभीर दुखापत झाली. अपघात इतका गंभीर होता की चालकाचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी अपघाताच्या ठिकाणी मदतीसाठी धाव घेतली होती.