चाकणला नगरपरिषदेसाठी हाय व्होल्टेज प्रचार,डिजिटल युगातही पारंपारिक प्रचाराची नांदी

Photo of author

By Sandhya

 सोशल मीडिया आणि डिजिटल युगात पारंपारिक प्रचाराचा बाज आजही कायम असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाषण, लाऊड स्पीकर, पत्रके, ध्वज, गमजा, मफलर, टोपी प्रचारात प्रभावी ठरत आहे. त्यामुळे डिजिटल युगातही पारंपारिक प्रचाराच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. विशेष म्हणजे चाकण नगरपरिषदेसाठी हाय व्होल्टेज प्रचार मोठ्या धुमधडाक्यात सुरू असून, पारंपारिक प्रचाराच्या नांदीला तुफान वेग आला आहे.
  चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची मोठी राळ उडाली आहे. चाकणच्या निवडणुकीत सध्या डिजिटल यंत्रणेवरच भर असला तरी, पारंपारिक प्रचारही तेवढाच प्रभावी ठरत आहे. त्यामुळे पारंपारिक प्रचाराच्या माध्यमातून भर देण्यास उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे. पूर्वी पेंटर कडून भिंती रंगवून, प्रचार बॅनर तयार केले जात असत. रिक्षा व इतर वाहनांच्या माध्यमातून ध्वनिक्षेपकाद्वारे मतदानाचे आवाहन करावे लागत होते. प्रचार पत्रके वाटावीच लागतात. ध्वज, गमजा, मफलर व टोपी यांचीही क्रेझ कायम आहे. डिजिटलचे गुणगान कितीही गायले तरी पारंपारिक प्रचाराचा बाज आजही कायम असल्याचे चाकणच्या निवडणुकीतून सिद्ध होत आहे. कोणतीही निवडणूक म्हटले की प्रचार आलाच. परंतु पूर्वीची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक यात चांगलाच फरक दिसून येतो. पूर्वी साधनांची कमतरता होती. मात्र, आता साधनांची मुबलकता आहे. बदलत्या काळानुसार प्रचार आणि प्रचाराची साधने बदलली. सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आदी माध्यमातून प्रत्येक जण व्यक्त होऊ शकतो. राजकारणातही या माध्यमाचा वापर मोठ्या खुबीने सध्या केला जात आहे. चाकण शहरात सध्या सर्व उमेदवारांची प्रचार वाहने प्रचारासाठी शहर व वाड्या वस्त्यांवर फिरत आहेत. अत्यंत उत्सुकतेची बाब म्हणजे चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी परप्रांतीय तरुण सायकलवर चहुबाजूने उमेदवारांच्या माहितीची व चिन्हांची पोस्टर लावून प्रत्येक प्रभागात प्रचार करत आहेत.
 " चाकण शहर व गल्लीबोळातून सायकल घेऊन सायकलस्वार उमेदवाराचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रचार करत आहेत. डिजिटल युगात पारंपारिक प्रचाराचा बाज कमी होत चालल्याची चर्चा असली तरी, आजही त्याचे अस्तित्व जिवंतपणे पाहायला मिळत आहे."

Leave a Comment

You cannot copy content of this page