छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासाचा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा

Photo of author

By Sandhya

▪️ कामाची गुणवत्ता राखून जलद काम तातडीने करण्याची दिली सूचना


स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील बलिदानस्थळ व वढू बु. येथील समाधीस्थळ येथे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. स्मारकाच्या विकासकामांची गुणवत्ता, टिकाऊपणा व गती राखून कामे पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, उपअभियंता अजय पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भोसले म्हणाले की, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या या पवित्र भूमीत दर्शन घेऊन एक वेगळी ऊर्जा व शक्ती लाभते. महाराजांनी धर्मासाठी केलेल्या बलिदानाचे दर्शन घडविणाऱ्या या स्थळी स्मारक विकासाची विविध कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहेत. विभागाचा मंत्री म्हणून या विकासकामांद्वारे पूर्वजांच्या कार्याला न्याय देण्याचे कार्य होत आहे.”

ते पुढे म्हणाले की, “स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे तुळापूर व वढू बु. येथील स्थळ पर्यटन स्थळ न ठरता तीर्थस्थळ म्हणून नागरिकांनी पाहावे. या पवित्र स्थळाला तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा आहे.”

जिल्हा प्रशासनाच्यावतीने वढू येथील केईएम हॉस्पिटल ची जागा स्मारकच्या विकास कामासाठी हस्तांतरणासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून राज्य शासनाच्या महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत पुढील आठवड्यात चर्चा करून या बाबतीत मार्ग काढण्यात येईल. संपूर्ण समाधीस्थळाचा सुशोभीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही श्री. भोसले यांनी सांगितले.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा आणि ईश्वरपुरम् वसतीगृहाला भेट

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसेवा प्रतिष्ठानच्या पुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेला भेट देऊन सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांची मानवंदना स्विकारली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक पाहिले. लोकसेवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारलेले मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे ६ फूट x ६ फूट आकाराचे चित्र पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

त्यानंतर ‘ईश्वरपुरम्’ या भारताच्या पूर्वांचलातील विद्यार्थ्यांसाठीच्या वसतीगृहाला भेट दिली. ‘ईश्वरपुरम्’ संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर आणि संदीप पूरकर परिसरातील बांधकामाची माहिती दिली. मंत्री श्री. भोसले यांनी चीन म्यानमारच्या सरहद्दीवरील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक दीपकजी पायगुडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रशांत जोशी, विश्वस्त बाळासाहेब चांदेकर, युवराज पाटील, पंकज जगताप, राहूल वागसकर आदी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page