
जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण काही कमी होत नसून आता तो भक्ष्यासाठी घराभोवताली असणाऱ्या दहा फूट उंचीच्या तार कंपाउंडवरूनही उडी घेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जुन्नर तालुक्यातील आर्वी येथील स्वामीनगर शिवारात जितेंद्र सावळेराम भोर यांच्या तारांगण बंगल्यामध्ये रविवार दि. 21 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दहा फुटाच्या कंपाउंडवरून प्रवेश करून त्यांच्या पाळीव कुत्र्याला जखमी केले.तसेच त्याच वेळेस आर्वी येथेच शिंदे खानावळ हॉटेलमध्ये बिबट्याने कंपाऊंडवरून प्रवेश केला. त्यामुळे आर्वी येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अखिलेश गावडे,भावेश डोंगरे, राहुल मुळे आदी नागरिकांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली होती.त्यानुसार वनरक्षक ज्ञानेश्वर पवार,आपदा मित्र सुशांत भुजबळ, शंतनू डेरे यांनी पिंजरा लावला आहे.