झेंडेवाडी येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले घटनाघर व्हावे – डॉ. बाबा आढाव

Photo of author

By Sandhya


झेंडेवाडी(दिवे)दिनांक २५/०८/२०२५ ख्यातनाम सत्यशोधक विचारवंत डॉ. बाबा आढाव आणि सेवानिवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर झेंडे यांचा झेंडेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी आणि सैनिक कल्याण मंत्री दादा जाधवराव यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सत्कारमूर्तींना महात्मा फुले पगडी आणि महावस्त्र भेट देवून गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम भाजपाचे पुरंदर – हवेली निवडणूक प्रमुख युवानेते बाबासाहेब जाधवराव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली झेंडेवाडीकरांनी यशस्वी करून दाखविला.
सदर प्रसंगी भाऊसाहेब झेंडे, ज्ञानेश्वर खटाटे, अजित गोळे, पुष्पा काळोखे यांनी मार्मिक शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ समाजवादी विचारवंत रावसाहेब पवार, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते राजेंद्र बहाळकर, शीलाताई आढाव, पुष्पा काळोखे, झेंडेवाडीच्या सरपंच वंदना खटाटे, उपसरपंच सोनाली झेंडे, शांताराम खटाटे, संतोष झेंडे, पुरंदर न्यूजचे संपादक प्रा. प्रदीप जगताप आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा हृद्य सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमास झेंडेवाडीसह दिवे पंचक्रोशी आणि पुरंदर व हवेली तालुक्यातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील लोक मोठया संख्येने उपस्थित होते. या शिवाय सदर कार्यक्रमास डॉ. बाबा आढाव आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांचे नातेवाईक आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुरंदर न्यूज चॅनलचे संपादक प्रा. प्रदीप जगताप यांनी येथील सवाई हॉटेलमध्ये डॉ. बाबा आढाव आणि मधुकर झेंडे यांची विस्तृत मुलाखत घेतली.
झेंडेवाडी येथील ढोल आणि झांजपथकाच्या कलाकार युवकांनी डॉ. बाबा आढाव, शीलाताई आढाव, मधुकर झेंडे आणि त्यांच्या भगिनी पुष्पाताई उल्हास काळोखे यांना व सर्व मान्यवरांना वाजत गाजत सभास्थानी नेले. डॉ. बाबा आढाव यांनी पथकातील सर्व कलावंतांचा सोनचाफ्याचे पुष्प देवून सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामधून झेंडेवाडी हे डॉ. बाबा आढाव यांचे आजोळ असल्याचे सांगून या सत्कार समारंभाचे वेगळेपण खोरे यांनी अधोरेखित केले. तसेच मधुकर झेंडे हे झेंडेवाडीचे सुपुत्र असल्या कारणाने हा सत्कार महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची घटना असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक बाबासाहेब जाधवराव यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाच्या माध्यमातून मधुकर झेंडे यांच्या जीवन व कार्याचा पट उलगडून दाखविला तर डॉ. बाबा आढाव यांच्या निःस्वार्थी कार्याचा दाखला देवून त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व अतुलनीय असल्याचे प्रतिपादन केले.
डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून डॉ. बाबा आढाव यांच्या पुरोगामी विचारांचा अनेक दुर्मिळ संदर्भ देवून बाबांचे सपग्र जीवन हे पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे पर्व असल्याचे सांगून श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले.
पुरंदर तालुक्यामध्ये समाजवादी विचारांच्या चळवळीस समर्पित भावनेने योगदान देणारे रावसाहेब पवार यांचाही या कार्यक्रमामध्ये म. फुले पगडी आणि महावस्त्र भेट देवून सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा जाधवराव यांचा म. फुले पगडी आणि महावस्त्र भेट देवून विशेष सत्कार करून झेंडेवाडी येथील ग्रामस्थांनी लोकनेते दादा जाधवराव यांनी संतवृत्तीने केलेल्या राजकीय व सामाजिक कार्याचा कृतज्ञता पूर्वक गौरव करून दादांच्या समग्र कारकिर्दीचा गौरव केला.
सत्कारास उत्तर देतांना मधुकर झेंडे यांनी जाधवराव घराण्याच्या गौरवशाली इतिहासाचे दाखले दिले व झेंडेवाडीचे इतिहासाला लाभलेले योगदान कथन करून तरुणांना अभ्यास करण्याचे व खोटे आचरण न करण्याचे आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. बाबा आढाव यांनी झेंडेवाडी आणि पुरंदर तालुक्यातील पाणी प्रश्न आणि शेती या विषयी असलेल्या वास्तवाचे भान श्रोत्यांच्या लक्षात आणून दिले तसेच भारतीय जनतेने जात, धर्म, प्रांत आणि लिंग या वर आधारित विषमतेला नष्ट करण्यासाठी गाव तेथे घटनाघर हा नारा देवून उपस्थितांना भारतीय संविधानाचे महत्व पटवून दिले. आणि झेंडेवाडी येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले घटना घर निर्माण व्हावे ; सर्व जाती, धर्म, प्रांताचे स्त्री पुरुष कुठलाही भेदभाव मनात ठेवता त्या संविधान मंदिरात केवळ भारतीय म्हणून एकत्र येतील असा आशावाद व्यक्त केला आणि असे घटनाघर निर्माण व्हावे म्हणून झेंडेवाडी ग्रामपंचायतीस देणगी म्हणून अकरा हजार रुपयांचा चेक दिला.
झेंडे वाडी येथील कन्या डॉ आकांक्षा झेंडे हिने फिलीपिन्स या देशातून एम बी बी एस ही पदवी मिळवली. या निमित्ताने तिचा देखील सत्कार या समारंभात करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप करतांना राज्याचे ज्येष्ठ नेते दादा जाधवराव यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर झेंडे, बाबूराव गोळे, अशोक झेंडे, अप्पा झेंडे, शिवाजी खटाटे ——— यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र बहाळकर यांनी केले तर अमर झेंडे यांनी आभारप्रदर्शन केले

Leave a Comment

You cannot copy content of this page