
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २४ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीची ऐतिहासिक घोषणा केली. ही युती मुंबई महानगरपालिकेपुरती असून उर्वरित महाराष्ट्रातील अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये युती असणार का, याविषयीचा निर्णय येत्या १-२ दिवसांत होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या वेळी खासदार संजय राऊत हेही व्यासपिठावर उपस्थित होते. १५ जानेवारी या दिवशी राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकी होणार असून १६ जानेवारी या दिवशी निकाल घोषित होणार आहे.
एकत्र आलो आहोत, ते एकत्र रहाण्यासाठी. मुंबई आणि महाराष्ट्र यांवर कुणी वाकड्या दृष्टीने पहाणार्यांना नष्ट केल्याविना रहाणार नाही. मराठी माणूस फुटला, तर नष्ट होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार ! – राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. या वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याला प्रारंभ झाला. कोण किती जागा लढवणार, हे आता सांगणार नाही. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार.असे राज ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीतून बाहेर !
महाविकास आघाडीतील सहभागाविषयी पत्रकारांनी विचारले असता, महाविकास आघाडीतून सर्व पक्ष बाहेर पडून महाविकास अबाधित आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडातील सहभाविषयी उपरोधिक बोलले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमवेत मनसे आल्यास काँग्रेसने स्वत:ची भूमिका आधीच घोषित केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमवेत मनसे आल्यास त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल, असे काँग्रेसच्या नेत्यांनी यापूर्वी म्हटले आहे.