
ज्ञानेश्वर विद्यालयात सायबर गुन्ह्यांबाबत जागृती कार्यक्रम आयोजित
आळंदी : “डिजिटल युगात तंत्रज्ञान आपले जीवन सुलभ करत असले, तरी त्याचाच गैरवापर झाल्यास तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने आणि सजगतेने करावा,” असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्ह्यांबाबत जागृती कार्यक्रम आळंदीत आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणे आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, भाजप पश्चिम महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडीचे संजय घुंडरे, पोलिस कर्मचारी मच्छिंद्र शेंडे, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायनी राजहंस आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आयुक्त चौबे यांनी ऑनलाइन सायबर गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना जागरूकतेचे महत्त्व पटवून दिले. “सायबर जगतात सावध राहणे म्हणजे स्वतःचे आणि समाजाचे रक्षण करणे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी विद्यार्थ्यांना विविध सायबर गुन्ह्यांचे प्रकार समजावून सांगितले. ऑनलाइन फसवणूक, बनावट ओळखपत्रे, ओटीपी घोटाळे, बँक फसवणूक, सोशल मीडियावरील गोपनीयता, पासवर्ड सुरक्षा, फिशिंग आणि ट्रोलिंग यांसारख्या विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.“अज्ञात लिंकवर क्लिक करू नका, वैयक्तिक माहिती कुणाशीही शेअर करू नका, संशयास्पद संदेश मिळाल्यास लगेच तक्रार नोंदवा,” असा ठोस इशाराही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. पोलिसांकडून डिजिटल साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी आणि सायबर संरक्षणाचे उपाय विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पोलिस अधिकाऱ्यांनी संयमाने उत्तरे दिली.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सायबर सुरक्षिततेची शपथ घेत डिजिटल जगात जबाबदारीने वर्तन करण्याचा संकल्प केला.