
चाकण शहराजवळील नाणेकरवाडी (ता. खेड,जि. पुणे) येथे एका तरुणाचा चारचाकी मोटारीमध्येच गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.सदर घटना सोमवारी मध्यरात्री घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून,प्राथमिक तपासात ही घटना पूर्व वैमनस्यातून घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विकास लक्ष्मण नाणेकर (वय ४४ वर्षे,राहणार सुदाम्याचे पोहे अपार्टमेंट शेजारी, नाणेकरवाडी, चाकण ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकण जवळील नाणेकरवाडी येथे हुंदाई कंपनीच्या चारचाकी मोटारीत निघृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर २०२५ ) रोजी सकाळी ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या स्थितीतील मृतदेह रक्ताने भरलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर उघडकीस आला आहे.
घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.शव ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
चाकण पोलिसांनी याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.श्वान पथकांच्या मदतीने परिसरात पाहणी करण्यात येत आहे.या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चाकणसह नाणेकरवाडी परिसरात तणावपूर्ण शांतता असली तरी चाकण पोलिसांनी या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.