
उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण शहर व चाकण एमआयडीसीतील तरुणी व विवाहित महिलांचे बेपत्ता व कायमस्वरूपी गायब होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
दररोज एक ना एक व्यक्ती बेपत्ता झाली असल्याची तक्रार चाकण पोलीस ठाणे, महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाणे व पाईट चौकीत दाखल झालेल्या पोलीस दप्तरी नोंदीवरून दिसून येते. चाकण पंचक्रोशीतून बेपत्ता होण्याचे प्रमाण धक्कादायक असून यामध्ये विशेष करून अल्पवयीन तरुणी व विवाहित महिलांची संख्या जास्त आहे. चिंताजनक बाब म्हणजे अगदी लहान मुलांना सोडून काही महिला कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता बेपत्ता होत आहेत. अल्पवयीन मुली, वय १८, २० ते २५ वयाच्या तरुणी, तसेच ३० ते ४० वर्षांच्या महिलांचे बेपत्ता होण्याच प्रमाण वाढलेले आहे.
दर महिन्याला साधारणपणे दहा ते बारा तरुणी व महिला बेपत्ता होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कोर्ट मॅटर सुरू असल्याने तरुणी व विवाहित महिला दहा - बारा वर्षे उलटून गेले तरी घरी परतल्याच नाही, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येते. प्रेम प्रकरण, घरातील भांडण, कोर्ट मॅटर, प्रेम विवाह, अनैतिक संबंध, लग्नाला विरोध, घरातील छळ, मानसिक त्रास, नोकरीची इच्छा, खोटे अमिष, जबरदस्ती, अपहरण अशा विविध कारणांमुळे अचानकपणे गायब झालेल्या तरुणींचा शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने नातेवाईकांसह पोलीस प्रशासनही हतबल झाले आहे.
सन २०२४ मध्ये ११७ महिला बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ८६ महिला सापडल्या. आणि ३१ तरुणी सापडलेल्या नाहीत. सन २०२५ मध्ये १२९ तरुणी बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ७२ तरुणी सापडल्या. तर ५७ तरुणी सापडलेल्या नाहीत.
” तरुणींनी मनावर ताबा ठेवून अगदी संयमाने परिस्थिती हाताळण्याची गरज आहे. आपल्याला कोणापासून मनस्ताप सहन करावा लागतो. याची माहिती आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना दिली पाहिजे. अचानक बेपत्ता होणे अथवा गायब होणे हा त्यावर उपाय नाही. आपल्या बेपत्ता होण्यामुळे आपली आणि घरच्यांची बदनामी तर होतेच, पण घरच्यांना किती मरणयातना सहन कराव्या लागतात, याचे भान आणि जाणीव ठेवण्याची गरज आहे.”