द्वितीय आंतरराष्ट्रिय खरेदीदार-विक्रेता परिषद पुण्यात उत्साहात संपन्न

Photo of author

By Sandhya

महाराष्ट्रातील सूक्ष्म व लघु उद्योगांना जागतिक बाजारपेठेकडे नेणारी परिषद ठरेल प्रभावी माध्यम

पुणे, दि. ७ नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा):
महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि इंडिया एस एम इ फोरम (सूक्ष्म उद्योग मंच )यांच्या संयुक्त विद्यमाने, केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ‘रॅम्प’ (सूक्ष्म उद्योग कार्यक्षमता वृद्धी व गती योजना) या उपक्रमांतर्गत राज्यातील द्वितीय आंतरराष्ट्रिय खरेदीदार-विक्रेता परिषद मोठ्या उत्साहात पार पडली.
सदर परिषद विमाननगर, पुणे येथील फोर पॉइंट्स बाय शेरेटन हॉटेलमध्ये ६ व ७ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसांदरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या उद्घाटन सत्राला महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विकास पानसरे (भा.प्र.से.), इंडिया सूक्ष्म उद्योग मंचाचे अध्यक्ष श्री. विनोद कुमार, महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती प्रशाली दिघावकर, तसेच मंचाच्या महासंचालिका श्रीमती सुषमा मोरथानिया उपस्थित होत्या.
या परिषदेत १६ देशांतील ४१ परदेशी खरेदीदार तसेच महाराष्ट्रातील ३०० हून अधिक सूक्ष्म व लघु उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले. परिषदेदरम्यान ५०० हून अधिक व्यावसायिक बैठका घेण्यात आल्या. या बैठकींत उद्योगांमधील सहकार्य, निर्यातवृद्धी, उत्पादन गुणवत्ता, तंत्रज्ञान देवाणघेवाण व नव्या व्यावसायिक संधींवर सखोल विचारविनिमय झाला.
महाराष्ट्रातील उद्योजक आणि परदेशी खरेदीदार यांच्यात एकूण ३२ सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योगांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या परिषदेत निर्यातविषयक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय व्यापारातील संधी, निर्यात प्रक्रियेतील अडथळे, गुणवत्तेचे जागतिक निकष, व्यापार प्रोत्साहन धोरणे आणि तांत्रिक सक्षमीकरण या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
समारोप सत्रास भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय रॅम्प विभागाचे उपसंचालक श्री. नरेंद्र जीना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी सहभागी उद्योजकांचे अभिनंदन करताना सूक्ष्म उद्योगांनी जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवकल्पना, गुणवत्ता आणि प्रामाणिकता या तिन्ही अंगांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले.

या द्वितीय आंतरराष्ट्रिय खरेदीदार-विक्रेता परिषदेच्या यशस्वी आयोजनातून महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे वाटचाल करण्याचा, निर्यात क्षमतेला चालना देण्याचा आणि राज्याच्या औद्योगिक प्रगतीला गती देण्याचा नवा टप्पा गाठला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page