

पोलीस प्रशासनाला निवेदन, व्यवहार रद्द करून सातबारा दुरुस्त करण्याची मागणी
नीरा, दि. 27
पुण्यातील जैन समाजाच्या एचएनडी (जैन) वस्तीगृहाच्या विक्री प्रकरणाविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज (सोमवारी )नीरा येथे जैन बांधवांनी शांततामय पद्धतीने मूक मोर्चा काढून या व्यवहाराचा निषेध नोंदवला. या मोर्चातून “विक्री व्यवहार तात्काळ रद्द करून सातबाऱ्यावरून गोखले कन्स्ट्रक्शनचे नाव हटवावे” अशी मागणी करण्यात आली.
जैन बांधवांनी आज सोमवारी सकाळी निरेतील जैन मंदिरातून मूक मोर्चाला सुरुवात केली. हा मोर्चा बुवासाहेब चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी चौक, ग्रामपंचायत कार्यालय असा मार्गक्रमण करून पुन्हा जैन मंदिरात संपन्न झाला. मोर्चात शेकडो जैन बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता. संपूर्ण मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडला.
यावेळी नीरा पोलिस दूरक्षेत्राचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांना मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले. तसेच ग्रामपंचायतीत उपसरपंच राजेश काकडे यांच्याकडेही निवेदन सादर करण्यात आले.
या मोर्चात शांतिकुमार कोठडिया, मनोज शहा, पद्मराज कोठाडिया, रेणुका कोठाडिया, शैला शहा, नवेंदू शहा, सोज्वल शहा, अतुल होरा, कुणाल शहा, सुदर्शन जैन, सुधीर शहा, वर्धमान शहा, नीरज शहा, शांती शेठ शहा, अधिराज कोठाडिया, नेहा शहा, पल्लवी व्होरा, दीपा शहा, रूपाली शहा, अनुजा शहा, निकिता शहा, पल्लवी व्होरा यांसह मोठ्या संख्येने जैन समाजबांधव उपस्थित होते.
पुण्यातील जैन वस्तीगृहाची जागा ही जैन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राहण्याची सोय व्हावी म्हणून दान करण्यात आली होती. ती भूमी विक्रीसाठी वापरणे हा दानधर्माचा अपमान असल्याची भावना आंदोलनात व्यक्त करण्यात आली. “या ठिकाणी जैन मंदिर अस्तित्वात असूनही धर्मादाय आयुक्तांना या व्यवहाराची माहिती नसणे आश्चर्यकारक आहे,” अशी प्रतिक्रिया जैन बांधवांनी दिली.
राजू शेट्टी यांच्या वसतीगृह संदर्भातील आंदोलनाला या मूक मोर्चातून जैन बांधवांनी पाठिंबा दर्शविला. “जोपर्यंत सातबाऱ्यावरून गोखले कन्स्ट्रक्शनचे नाव हटत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.