पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला पूरग्रस्त भागातील पशुधन हानीचा व सुरक्षिततेचा आढावा

Photo of author

By Sandhya


पूरग्रस्त भागातील पशुधन हानीचा व सुरक्षिततेचा आढावा
· पूरग्रस्त भागात फिरती पशुवैद्यकीय पथके सक्रिय ठेवून तत्काळ सेवा द्या
· जनावरांना औषधे व लसींसाठी प्राधान्य द्यावे
· साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी निर्जंतुकीकरणावर भर द्या
मुंबई, दि. 26 : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पशुधनाच्या झालेल्या हानीचा व त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज आढावा घेतला. अतिवृष्टी व पुरामुळे मृत जनावरांच्या मालकांना योग्य ती शासकीय मदत मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने महसूल विभागाशी समन्वय साधावा, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. तसेच अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात जनावरांसाठी फिरती पशुवैद्यकीय पथके सक्रिय करून तत्काळ सेवा उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. घराबरोबरच जनावरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन पशुसंवर्धन विभागाला महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव रामास्वामी एन, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे उपस्थित होते. तसेच पूरग्रस्त भागातील प्रादेशिक सह आयुक्त, उपायुक्त हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
या आढावा बैठकीत बाधित भागातील जनावरांचे संरक्षण, मृत जनावरांची नोंद, तसेच आवश्यक मदत पुरवण्याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पूरग्रस्त भागात जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाच्या समन्वयाने मृत जनावरांची अचूक संख्या निश्चित करावी. मृत जनावरे/ न सापडलेली जनावरे याची खातरजमा जमा करावी. तहसील कार्यालय व पशुसंवर्धन विभाग यांच्यातील आकडेवारीत तफावत राहू नये, यासाठी काटेकोर पडताळणी करण्यावर भर द्यावा. मृत जनावरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे का याची तपासणी करावी. त्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक यंत्रे व मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावेत. जनावरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठकीत दिले.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, पूरबाधित क्षेत्रात साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी निर्जंतुकीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या भागात निर्जंतुकीकरणाचे (चुन्याची फक्की / फिनेल / पोटॉशिअम परमॅग्नेट इ.) औषधी फवारुन घेण्यासाठी ग्रामपंचायतीची मदत घेण्यात यावी. रोगप्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे. पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आवश्यक औषधी/ लस साठा उपलब्ध ठेवण्यात यावे. तसेच आवश्यकता भासल्यास नजिकच्या जिल्ह्यातून औषधी, लस साठा उपलब्ध करुन घेण्यात यावी. पुरामध्ये अडकलेल्या जनावरांचे स्थलांतरण सुरक्षित जागी करण्यात यावी. तसेच बाधित परिसरातील जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पशुसंवर्धन विभागाला सर्व आवश्यक मदत जसे की, वाहन उपलब्धता, अतिरिक्त मनुष्यबळ, चाऱ्याची उपलब्धता, जनावरांना तात्पुरते आश्रयस्थान तयार करणे आदींसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच पशुसंवर्धन विभागाला आपत्कालीन निधीतून तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. अतिरिक्त मनुष्य बळाची आवश्यकता भासल्यास नजिकच्या जिल्ह्यातून मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित प्रादेशिक पशुसवंर्धन सहआयुक्तांनी पार पाडावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page