पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याकरिता समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Photo of author

By Sandhya

पुणे, दि. १८: हर घर जल-जल जीवन मोहिमेअंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याकरिता जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, यादृष्टीने सर्वांगिण बाबींने विचार करुन जिल्ह्यातील एकही वाडी, वस्ती, शाळा, अंगणवाडी पाण्यापासून वंचित राहणार नाही,याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. डूडी म्हणाले, हर घर जल-जल जीवन मोहिमेअंतर्गतपाणी पुरवठा योजनांचा प्रस्ताव सादर करतांना शाश्वत पाणीसाठा, प्रकल्पाकरिता लागणारी जागेची उपलब्धता व त्याकरिता पर्यायी व्यवस्था, सोलार प्रकल्प, पाणी पुरवठा योजना चालविणारी यंत्रणा आदी सर्वांगीण बाबींचा समावेश करावा. प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रीत करुन ती गतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता प्रशासकीय यंत्रणेने स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. पुर्ण झालेली पाणीपुरवठा योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी. या योजनांकरिता लवकरात लवकर महावितरणने वीज जोडणी करुन द्यावी. पाणी पुरवठा योजनांअंतर्गत पाण्याचा शाश्वत स्त्रोतांचा समावेश करुनच अटल भूजल योजनेअंतर्गत आराखडा सादर करावेत. यापूर्वी जिल्हा भूजल विकास यंत्रणेने स्थळ पाहणी करुन पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करावी.

श्री. पाटील म्हणाले, जलजीवन मोहिमेत जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, यामाध्यमातून ९ हजार ३३५ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. जागेबाबत प्रलंबित कामाबाबत यंत्रणेने पाठपुरावा करावा, स्थानिक पातळीवरील विषय जागेवर मार्गी लावण्याकरिता समन्वय ठेवावा, असेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी जलजीवन मोहिमेतील कामांची सद्यस्थिती, जिल्हा परिषद आणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने कामाच्याअनुषंगाने प्रस्तावित आराखडा, कृती आराखडा, प्रगतीपथावरील कामे, कामे करतांना येणाऱ्या अडचणी, प्रकल्पाकरिता लागणरी जागा, वीज जोडणी आदी विषयांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

Leave a Comment

You cannot copy content of this page