पालिका आयुक्तांचा शेवाळवाडी–मांजरी दौरा,सहायक आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या,कामचुकार करणारे उपअभियंता निलंबित

Photo of author

By Sandhya

दोन दिवसापूर्वी पालिकेचे आयुक्त राम किशोर नवल यांनी शेवाळवाडीमांजरी परिसराच्या पाहणी दरम्यान कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास येताच आयुक्तांनी हडपसर व नगर रोड क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या तर दोन उपअभियंत्यांना निलंबित केले आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त राम किशोर नवल यांनी दोन दिवसापूर्वी सकाळी शेवाळवाडी व मांजरी परिसराला भेट देऊन शहरातील स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण तसेच नाल्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या समस्यांची पाहणी केली. या भेटीदरम्यान परिसरातील अस्वच्छता, रस्त्यांवरील कचरा आणि अपुरी स्वच्छता व्यवस्था पाहून आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भेटीदरम्यान संबंधित विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विचारणा करण्यात आली असता त्यांनी समाधानकारक माहिती न दिल्यामुळे आयुक्तांनी अकार्यक्षम व कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी स्पष्ट केले की, यापुढे निष्काळजीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खात्यांतर्गत चौकशी, निलंबन तसेच अकार्यकारी पदावर बदलीची कारवाई करण्यात येईल.याच वेळी, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. बाळासाहेब ढवळे पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता श्री. रवि खंदारे यांची नियुक्तीचे आदेश तातडीने देण्यात आले. तसेच, माननीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार मलनिःसारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक तसेच मुकादम या तिघांवर समाधानकारक काम न केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी मागील दोन दिवसांपूर्वी नगर रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाघोली भागात झालेल्या पाहणीदरम्यानही आयुक्तांनी ड्रेनेज व अतिक्रमण समस्यांबाबत निष्क्रियतेसाठी श्रीमती शितल वाकडे, सहाय्यक आयुक्त,नगर रोड व ड्रेनेज विभागातील उप अभियंता श्री विनायक शिंदे व श्री गणेश पुरम या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. पुणे–सोलापूर महामार्गावरील दुभाजकांमधील अस्वच्छतेबद्दल देखील आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित विभागांना स्वच्छता सुधारण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आयुक्तांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शहरातील अस्वच्छता, वाहतूक कोंडी, ड्रेनेज आणि अतिक्रमणाच्या समस्या दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम करणे आवश्यक आहे; अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.” महापालिका प्रशासनाच्या या कारवाईमुळे निष्काळजी व कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये कडक संदेश गेला असून, नागरिकांच्या मूलभूत सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने आता सज्जतेचा निर्धार व्यक्त केला आहे.__
कामात नेहमीच हलगर्जीपणा करत असल्याचे आयुक्त राम किशोर नवल यांच्या शेवाळवाडी_मांजरी भागाची पाहणी करतेवेळी निदर्शनास येताच आयुक्तांनी दोन उपअभियंत्यांना निलंबित केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page