पोलिसांकडून सराईत गुन्हेगार अटकेत : १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Photo of author

By Sandhya

स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाची कारवाई

नारायणगाव (अशफाक पटेल) – नारायणगाव आणि जुन्नर येथे घरफोडीचे गुन्हे करून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने अटक करून आरोपीकडून १६ तोळे सोने, ८४१ ग्रॅम चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोटार सायकलसह सुमारे १४ लाख ३७ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सपांगे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

या प्रकरणी विशाल दत्तात्रय तांदळे (वय २८ सध्या रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे मुळ रा. पाटेगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर) याला पोलिसांनी अटक केली असून सदर आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मालमत्ता चोरीचे एकुण २८ गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे. या कारवाईत नारायणगाव पोलीस स्टेशन येथील १) गु.र.नं. २१९/२०२५ BNS ३३१ (४), ३०५(अ), २) जुन्नर पोलीस स्टेशन येथील गु.र.नं. ३४२/२०२५ BNS ३३१(३), ३०५ (अ), ३) जुन्नर पोलीस स्टेशन येथील गु.र.नं. १४३/२०२५ BNS ३३१ (४), ३०५ (अ) असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

विष्णू भागूजी सांगडे (वय ६२ वर्षे रा. वैभवलक्ष्मी सोसायटी ए. विंग तिसरा मजला फ्लॅट नं. २१, विटेमळा नारायणगाव ता. जुन्नर) यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने बँकेत ठेवलेले दागिने घरी आणून कपाटात ठेवले होते. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून ते व त्यांची पत्नी नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताबाई देवीच्या काकड आरती साठी गेले होते. दरम्यानच्या काळात अज्ञात व्यक्तीने कडी कोयंडा तोडून सदनिकेत प्रवेश केला. बेडरुम मधील लाकडी कपाटातून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ११ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीसांचे संयुक्त पथक करत होते. सदर चोरी केल्यानंतर आरोपी मोटर सायकलवर पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून निष्पन्न करून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल विशाल तांदळे याची असल्याचे तपासात समोर आले. त्या आधारे तांदळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्याने नारायणगाव व जुन्नर परिसरात तीन घरफोड्या केल्याचे कबूल केले असून आरोपीकडून तीन घरफोड्या मधील १४ लाख ३७ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सपांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महोदव शेलार, पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजु मोमीन, संदिप वारे, अक्षय नवले, पोलीस उपनिरीक्षक सोमेशेखर शेटे, पोलीस अंमलदार मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, निलेश जाधव यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page