
प्रिया फुके यांनी सोमवार, 7 जुलै रोजी राज्य विधिमंडळाच्या इमारतीसमोर निदर्शने करून आपले आंदोलन तीव्र केले. घोषणाबाजी करत आणि फलक हातात घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. तिच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची मुले देखील होती. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रिया फुके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाला नवीन राजकीय वळण मिळाले आहे. यापूर्वी, तिने विविध माध्यमांद्वारे परिणय फुकेवर वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर गंभीर गैरवर्तनाचा आरोप केला होता. आता या प्रकरणाला आणखी गंभीर स्वरूप मिळाले असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
रोहिणी खडसे ट्विट करत म्हणाल्या, मंत्री परिणय फुके यांच्या भावाची पत्नी प्रिया फुके आज विधानभवनात न्याय मागण्यासाठी आली होती. तर तिला तिच्या मुलांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरे, जरा तरी लाज वाटू द्या रे गिधाडांनो! एक निराधार महिला आपल्याला न्याय मिळावा या अपेक्षेने आपल्या चिमुकल्या मुलांसह सरकारच्या दारात येते तर तिला अशाप्रकारे डांबण्यात येते ? कुठे हे फेडाल ही पापं? एका निराधार महिलेशी असे वर्तन झाले, कुठे आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा? कुठंय ती प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणारे चित्रविचित्र बाई? आता समोर नाही येणार का? का, आरोपी भाजपचे आहेत म्हणून? असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.
प्रिया फुके आज विधानभवनावर धडकल्या तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची मुले होती. त्यांनी पर्समधून काही दस्तऐवज काढण्याचा प्रयत्न केला. पण महिला पोलिसांनी त्यांनी रोखले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना न्यायाची मागणी केली. मी मुख्यमंत्र्यांकडे एक वर्षांपासून वेळ मागत आहे. पण मला वेळ मिळत नाही. मला न्याय हवा आहे. पण फुकेसारख्या माणसाला का सेफ केले जात आहे हे मला समजत नाही, असे त्या म्हणाल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.