
पुणे : मौजमजेसाठी तब्बल पाच दुचाकींची चोरी करणाऱ्या एका तरुणाला समर्थ पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. या आरोपीने एका विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने शहरातील विविध भागांतून मोटारसायकल चोरल्या होत्या. अटकेनंतर त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, आणखी गुन्ह्यांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
फिर्यादीने दिनांक २७ जुलै ते २८ जुलै २०२५ दरम्यान त्याची यमाहा कंपनीची दुचाकी घराखाली लॉक लावून पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १८१/२०२५ भादंवि कलम ३७९(२) नुसार तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच पोलीस अंमलदार इम्रान शेख व शरद घोरपडे यांच्या गोपनीय बातमीदारांच्या माहितीवरून आरोपी सुजल जीतेश जगताप (वय २२, रा. राम मंदिर मागे, राजेवाडी, नाना पेठ, पुणे) याची ओळख पटली. दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी कात्रज परिसरात सापळा रचून त्याला चोरीस गेलेल्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपी सुजल जगताप याने एक विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सदर दुचाकी हस्तगत करण्यात आली. पुढील तपासात त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे पुणे शहरातून इतर चार दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये बंडगार्डन व कोंढवा पोलीस ठाण्यातील एकेक गुन्हा आणि एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त (परिक्षेत्र-१) श्री. कृषिकेश रावले, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (फरासखाना विभाग) श्रीमती अनुजा देशमाने तसेच समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपासपथकात पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार संतोष पागार, रविंद्र औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे आणि भाग्येश यादव यांचा समावेश होता.