राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात

Photo of author

By Sandhya

बारामती, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा): स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 6 लाख 97 हजार रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा आणि एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

तालुक्यातील मौजे शिरवली गावाच्या हद्दीत सांगवी–बारामती रोड, माळेगाव फाटा येथे मिळालेल्या माहितीनुसार संशयित स्विफ्ट डिझायर (एमएच-01-बीएफ-9165) वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनात मध्यप्रदेशात विक्रीस परवानगी असलेले, मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित मद्याचा मोठा साठा आढळून आला. रॉयल स्टॅग व्हिस्की (180 मिली) चे 11 बॉक्स, इम्पेरियल ब्ल्यू (180 मिली) चे 4 बॉक्स आणि मॅकडॉवेल नं. 1 (180 मिली) चे 5 बॉक्स मिळून एकूण 20 बॉक्स जप्त करण्यात आले.

गाडी आणि मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी रामसिंह मोहबतसिंह राजपूत आणि महिपालसिंह राजसिंह राजपूत यांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक सागर साबळे, मनोज होलम, गिरीशकुमार कर्चे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, तसेच जवान निखिल देवडे, सुरेश खरात, सागर दुबळे आणि टी. एस. काळे सहभागी होते. पुढील तपास श्री. गिरीशकुमार कर्चे करीत आहेत, अशी माहिती श्री. शहाजी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Leave a Comment

You cannot copy content of this page