राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 71 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान

Photo of author

By Sandhya

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित

मराठी चित्रपट ‘शामची आई’, ‘नाळ 2’ आणि ‘जिप्सी’ चा गौरव

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते करण्यात आले. या मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .या सोहळ्यात मराठी चित्रपटांनी आपली गुणवत्ता आणि वैविध्य सिद्ध करत राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली. ‘शामची आई’, ‘नाळ 2’ आणि ‘जिप्सी’ या चित्रपटांनी मराठी सिनेमाची श्रीमंती अधोरेखित करत विविध श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले. वर्ष 2023 मधील उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांना सन्मानित करण्यात आले.

या केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, , माहिती व प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू आणि निवड समितीचे सदस्य आशुतोष गोवारीकर, पी.शेषाद्री, गोपालकृष्ण पाय व्यासपीठावर उपस्थित होते.

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

मल्याळम चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते मोहनलाल यांना भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चार दशकांहून अधिक काळ 400 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मितीच्या माध्यमातून भारतीय सिनेमाला समृद्ध करणाऱ्या मोहनलाल यांच्या अप्रतिम योगदानाचा यानिमित्ताने गौरव झाला. मल्याळमसह तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.

यापूर्वी 2001 मध्ये पद्मश्री आणि 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित मोहनलाल यांचा हा सन्मान त्यांच्या प्रेरणादायी कारकिर्दीतील आणखी एक सुवर्ण अध्याय आहे. त्यांचा हा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

मराठी चित्रपटांचा गौरव

शामची आई’: साने गुरुजींच्या अजरामर साहित्यकृतीवर आधारित ‘शामची आई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा रजत कमळ चा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार चित्रपटाचे निर्माते अमृता अरुण राव व दिग्दर्शक सुजय डहाके यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला.

सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला आणि मराठी चित्रपट मंडळ तसेच साहित्य संमेलन प्रॉडक्शन्स यांनी निर्मित केलेला हा चित्रपट शाम नावाच्या मुलाच्या दृष्टिकोनातून त्याच्या आईच्या प्रेम, त्याग आणि शिक्षणाची भावनिक कहाणी सांगतो. चित्रपटात संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भूतकर, शर्व गाडगीळ, सारंग साठ्ये, मयुर मोरे, ज्योती चांदेकर आणि सुनील अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. साध्या पण प्रभावी कथानकातून प्रेक्षकांना भावनिक प्रवासात गुंतवणारा हा चित्रपट मराठी साहित्याचा सिनेमातील यशस्वी प्रवास दर्शवतो. समीक्षकांनी चित्रपटाच्या सौंदर्यशास्त्र आणि अभिनयाचे विशेष कौतुक केले आहे.

‘नाळ 2’: 2018 च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘नाळ’ चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘नाळ 2’ ने दुहेरी यश मिळवले. आटपाट प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज यांनी निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कांती यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा सुवर्ण कमळ चा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कारआटपाट प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज यांच्यावतीने विजयकुमार बन्सल यांनी व चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कांती यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला.

चैत्या नावाच्या मुलाच्या भावनिक प्रवासाचा पुढील टप्पा दाखवणारा हा चित्रपट आपल्या खऱ्या आईला भेटण्यासाठी गावी गेलेल्या चैत्याला आपली बहीण आणि भाऊ असल्याचे कळण्याची कहाणी सांगतो.

याच चित्रपटातील त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकले आणि भार्गव जगताप यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार पुरस्कार मिळाला, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला. वऱ्हाडी बोली, ग्रामीण महाराष्ट्राचे नयनरम्य चित्रण आणि आई-मुलाच्या नात्यातील संवेदनशील चित्रण यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचा लाडका ठरला. ‘भिंगोरी’ आणि ‘डराव डराव’ ही गाणी विशेष लोकप्रिय झाली.

जिप्सी’: श्याम सूर्यवंशी दिग्दर्शित ‘जिप्सी’ मधील कबीर खंडारे याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार पटकावला, जो त्याने जो त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला. स्मिता तांबे यांच्यासह प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट एका भटक्या समाजातील मुलाच्या जीवनातील संघर्ष आणि स्वप्नांचा शोध घेतो. कबीरच्या सशक्त अभिनयाने चित्रपटाला भावनिक खोली प्राप्त झाली.

हिंदी चित्रपटातील मराठी योगदान

‘सॅम बहादूर’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील तांत्रिक योगदानासाठी मराठी कलाकारांचा गौरव झाला. श्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार आणि सचिन लवलेकर यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सॅम माणेकशॉ यांच्या व्यक्तिरेखेला जिवंत करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

नवोदित दिग्दर्शकाचा सन्मान

नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांच्या ‘आत्मपँफ्लेट’ या चित्रपटाला दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा (इंदिरा गांधी) पुरस्कार मिळाला. वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे आणि अनोख्या मांडणीमुळे या चित्रपटाचे विशेष कौतुक झाले.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये 2023 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून प्रमाणित चित्रपटांचा समावेश होता. यात ‘12th फेल’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला , तर शाहरुख खान (‘जवान’) आणि विक्रांत मेसी (‘12th फेल’) यांनी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि राणी मुखर्जी यांनी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. इतर प्रमुख विजेत्यांमध्ये ‘गॉड वल्चर अँड ह्युमन’ (सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री), ‘टाइमलेस तमिळनाडू’ (सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक चित्रपट), ‘कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री’ (सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट), ‘भागावान्थ केसरी’ (सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट), ‘पार्किंग’ (सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट), ‘गॉडडे गॉडडे चा’ (सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट), ‘वश’ (सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट), ‘डीप फ्रीजर’ (सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट), ‘हनूमान’ (सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट), वैभवी मर्चंट (‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ साठी सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी), आणि हर्षवर्धन रामेश्वर (‘अॅनिमल’ साठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन) यांचा समावेश आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page