जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद आनंदराव बुट्टे पाटील यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात बुट्टे हे गंभीर जखमी झाले आहेत. खेड तालुक्यातील पाईट - आंबेठाण या जिल्हा परिषद गटात शुक्रवारी (दि.६) रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली.
हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यात स्कॉर्पिओ गाडीच्या (क्र. एमएच १४ एलयू ७०७४) काचा फुटल्या. गाडी चालवत असलेल्या शरद आनंदराव बुट्टे पाटील (वय - ५०, रा. वराळे, ता. खेड) यांच्या कपाळावर दगड लागून त्यांना गंभीर जखम झाली. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र संदीप सुदाम मिरजे यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. संदीप मिरजे यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिरजे यांनी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मिरजे आणि बुट्टे पाटील हे शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान खेड येथून घरी परतीच्या मार्गावर निघाले होते. त्यांचा मित्र राहुल तरडे (रा. आसखेड, ता. खेड) यांना भेटण्यासाठी बुट्टे पाटील यांच्या स्कॉर्पिओ गाडीने ते आसखेड गावात गेले होते.
राहुल तरडे हे साळुंखे हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे कळाल्याने चहापाणी करून ते दोघे रात्री पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान धामणे गावाकडे जाण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी आसखेड ते धामणे रस्त्यावर शिवे परिसरात दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी बुट्टे पाटील यांच्या वाहनावर दगडफेक केली. त्यात बुट्टे पाटील हे गंभीर जखमी झाले. या घटनेची वार्ता जिल्हा परिषदेच्या या गटात समजतात संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.