
पुणे, दि. ३०: राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली २ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह, पाचवा मजला, पुणे येथे महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी दिली आहे.
या जनसुनावणी दरम्यान पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलीसांशी संबंधित सन २०२३, २०२४ आणि २०२५ या वर्षातील सुमारे ३५ प्रलंबित तक्रारींची वॉक-इन तक्रारदारांसह सुनावणी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाच्यावतीने दुपारी १२ वाजता संबंधित ठिकाणी प्राथमिक सुनावणी सुरु करणार असून आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रहाटकर ह्या दुपारी २ वाजता सुनावणी घेणार आहेत.
या जनसुनावणीसाठी तक्रारदार महिलांना थेट सुनावणीस उपस्थित राहून त्यांची तक्रार लेखी स्वरुपात मांडता येणार असून पीडित वा तक्रारदार महिलांनी जनसुनावणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहनही श्रीमती बिरारीस यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.