
पुणे_सध्या विश्रांतवाडी परिसरात उड्डाणपुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे येथे नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.यामुळे नगरारोड पाठोपाठ वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात विश्रांतवाडी परिसर अडकल्याने नेहमी होणाऱ्या कोंडीने स्थानिक नागरिक हैराण झाले आहे.
येरवडापाठोपाठ पूर्व हवेलीचा मुख्य भाग म्हणून विश्रांतवाडी भागाकडे प्रामुख्याने पाहिले जात आहे.परिसरातून श्री क्षेत्र लोहगावसह आंतरराष्ट्रीय लोहगाव विमानतळ,श्री क्षेत्र आळंदी,पुणेशहर यासह परिसरातील कळस,धानोरी,शांतीनगर,मेंटल कॉर्नर आदी भागाकडे प्रामुख्याने मार्ग जात आहे.त्यामुळे बहुतांश प्रमाणात कामगार वर्ग परिसरात स्थायिक झाले आहेत.येथील मुख्य चौकात नेहमीच होणाऱ्या कोंडीतून वाहनचालकांची सुटका होण्याच्या उद्देशाने कोट्यवधी रुपये मंजूर करून या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करून त्याचे तात्काळ काम देखील हाती घेऊन शांतीनगर,कळस,धानोरी व लोहगाव भागाकडे जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपुलाच्या कामाचे खोदकाम सुरू आहे.
खोदकाम सुरू असल्या कारणाने असलेले रस्ते देखील अरुंद झाल्याने या चार ही मार्गावर वाहनांच्या लांबवर रांगा लागून वाहतूक कोंडीचे चित्र नेहमी दिसून येत आहे.सध्या शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाने डोके वर काढून तो गाजत असतानाच या ठिकाणी देखील त्याप्रमाणेच परिस्थिती झाल्याने कामगार वर्गांना कामाच्या ठिकाणी रुजू होणे देखील कठीण झाले आहे.विशेष म्हणजे होणाऱ्या कोंडीने पादचारी नागरिकांना रस्ता पार करणे कठीण झाले असतानाच परिसरात शासकीय शाळा बरोबरच खाजगी संस्थांच्या शाळा असल्याने अनेक विद्यार्थी हे शाळेत जाताना पायी जात असतात.मात्र येथील कोंडी पाहून अनेक विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्याची धास्ती निर्माण होऊन अनेकांना हातातले काम सोडून मुलांना शाळेत सोडविण्याची वेळ येत आहे.यामुळे छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना देखील वारवार घडत असून कामगार वर्गांना या ठिकाणाहून जाताना कसरत करूनच वाहन चालविण्याची वेळ येत आहे.
अगोदरच अरुंद रस्त्याने वाहनचालक हैराण झाले असताना दुसरीकडे अनेक व्यावसायिकांनी रस्त्यालगतच व्यवसायाची दुकाने थाटल्यामुळे येथे येणाऱ्या ग्राहकांच्या गोंधळात वाहनचालक फरफट ला गेला आहे.वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी.यासाठी अनेक वाहनचालक हे अंतर्गत असलेल्या चव्हाण चाळीतील मार्गाचा वापर करत आहेत.मात्र या मार्गावर वाहनांची संख्या ही दिवसेदिवस वाढू लागल्याने भविष्यात होणाऱ्या अपघाताच्या भीतीने येथील स्थानिक नागरिकांनी दोन दिवसापूर्वीच हा मार्ग बंद केल्याने वाहनचालकांची इकडून आड तर तिकडून विहीर अशी बिकट स्थिती झाली असताना येथील नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीचे कोडे सोडविणे हे वाहतूक नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या समोर एकप्रकारचे आव्हानच उभे राहिले आहे.येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास कमीत कमी दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागणार आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकांना नेहमीच या कोंडीस सामोरे जाण्याची वेळ येत राहणार त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी येथील नागरिकांना पर्यायी मार्ग तरी उपलब्ध करून देणे गरजेचे असताना ते न करताच पुलाचे काम सुरू केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.तरी वाहनचालकांची नाही तर स्थानिक नागरिकांची मुख्य समस्या लक्षात घेऊन येथील होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यात यावेत.अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.