विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी

Photo of author

By Sandhya

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.7 : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, राधा यादव यांना प्रत्येकी २ कोटी २५ लाख, तर प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना २२ लाख ५० हजार आणि सर्व सहकारी यांना प्रत्येकी ११ लाख रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये प्रथमच भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा वर्षा या शासकीय निवासस्थानी सत्कार केला. गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी, पद्मश्री डायना एडल्जी, ॲनालिस्ट अनिरुद्ध देशपांडे, लॉजिस्टिक सपोर्ट अपर्णा गंभीरराव, ऑपरेशन मॅनेजर मारुफ फजानदार, मिहिर उपाध्याय, पूर्वा काटे, ममता शिरसुल्ला यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त शितल तेली, उपसचिव सुनील पांढरे उपस्थित आहेत.
सत्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विश्वचषकात भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. याचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे. या विजयाने भारताचा गौरव वाढवला आहे. सुरुवातीच्या काही पराभवानंतर संघाने केलेली पुनरागमनाची कामगिरी उल्लेखनीय आहे. प्रत्येक खेळाडूने कुठल्या ना कुठल्या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. प्रशिक्षक आणि संपूर्ण संघाचे विशेष अभिनंदन करावे लागेल. या संघातील एकजूट आणि संघभावना महत्वाची असून यामुळे विजय मिळविणे शक्य झाले.
स्मृती मानधना सध्या भारतातील आयकॉनिक खेळाडूंमध्ये गणली जाते. तिचा सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे. ती लवकरच दहा हजार धावांचा टप्पा गाठेल. जेमिमाह रॉड्रिग्ज ने ही सेमीफायनलमध्ये अप्रतिम खेळी सादर केली. राधा यादवने संघर्षमय प्रवास करत आपले अस्तित्व निर्माण केले असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑलिम्पिक मध्ये भारतीय महिला संघ विजय मिळवेल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी संघासाठी घेतलेली मेहनत आणि क्रिकेटमधील त्यांची कामगिरी प्रेरणादायी आहे. क्रिकेटला लोकप्रिय करणाऱ्या जुन्या पिढीतील सर्व खेळाडूंमुळे आज क्रिकेट या उंचीवर पोहोचले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचेही अभिनंदन करताना ते महणाले की, महिला क्रिकेटला त्यांनी स्वतंत्र ओळख आणि दर्जा मिळवून दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महिला क्रिकेटच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे. पद्मश्री डायना एडल्जी यांनी लावलेले रोपटे आज मोठे झाले आहे. ग्रामीण भागातील मुलींना संधी मिळाली तर त्या जागतिक स्तरावर यश प्राप्त करू शकतात हे या क्रिकेट संघातील खेळाडूंनी सिद्ध केले आहे.
या विजयाने क्रीडा रसिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, भविष्यातही आपण असेच यश प्राप्त कराल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.
स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, राधा यादव, प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी आभार मानत, सर्व संघाचे आणि क्रिकेट प्रेमींचे आभार मानले. बीसीसीआयच्या अखंड पाठिंब्यामुळे आणि खेळासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
००००

Leave a Comment

You cannot copy content of this page