




संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज सायंकाळी जेजुरी नगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. संध्याकाळी पाचच्या सुमारास पालखी जेजुरी मुक्कामी दाखल झाली आणि त्या क्षणापासून संपूर्ण जेजुरी भक्तिरसात नाहून गेली. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ आणि ‘माऊली माऊली’च्या गजरात जेजुरीच्या रस्त्यांवर, घाटांवर आणि मंदिर परिसरात भक्तांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळाली.
जेजुरीकरांनी माऊलींच्या रथावर पिवळ्या भंडाऱ्याची मुक्त उधळण करत साष्टांग दंडवत घालून स्वागत केलं. अक्षरशः पंढरीचा अनुभव खंडोबाच्या नगरीत अनुभवायला मिळाला. रथावर फुलांचा वर्षाव, टाळ-मृदंगाचा गजर आणि डोळ्यांत भक्तीभाव अशा वातावरणात माऊलींचा रथ पिवळ्या भक्तिरसात नाहून गेला.
जेजुरी ही खंडोबाची – म्हणजेच महादेवाची भूमी. इथे दरवर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं खास स्वागत केलं जातं. आज येथे शैव आणि वैष्णव परंपरेचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला. लाखो वैष्णव वारकऱ्यांनी खंडोबाचं दर्शन घेतलं, तर जेजुरीतील शिवभक्तांनी माऊलींचं दर्शन घेतलं. भक्तीच्या या संगमामुळे जेजुरीत एक वेगळंच आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळालं.
वारकऱ्यांच्या बरोबरच जेजुरीकरांच्या चेहऱ्यावर माऊलींच्या दर्शनाची आस, डोळ्यांत भेटीची ओढ आणि मनात समाधानाची भावना स्पष्ट दिसून येत होती. माऊलींचा रथ जणू भक्तांच्या हृदयातूनच मार्गस्थ होत होता.
आजचा मुक्काम जेजुरीत असून, उद्या सकाळी हा पालखी सोहळा वाल्हे गावाकडे प्रस्थान करणार आहे. वाल्हे हे गाव वाल्मिकींच्या पदस्पर्श स्पर्शाने पावन झालेलं गाव मानलं जातं. त्यामुळे उद्याचा दिवसही भक्तांसाठी नव्या आध्यात्मिक अनुभूतीचा असेल यात शंका नाही.