सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे -विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार

Photo of author

By Sandhya

▪️माजी सैनिकांच्या प्रलंबित कामांसाठी प्रशासनाने ‘एक खिडकी योजना सुरु करावी

पुणे दि. 9 डिसेंबर: मातृभूमीची सेवा बजावताना वीरमरण आलेल्या, जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरीता प्रशासनासोबतच नागरिकांनी सामाजिक कर्तव्याच्या निस्वार्थ भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे, तसेच त्यांच्या प्रश्नासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ एक खडकी योजना ‘ सुरु करावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी पुणे महानगरपालिका आयुक्त श्री.नवल किशोर राम, जिल्हाधिकारी श्री.जितेंद्र डूडी, अपर जिल्हाधिकारी श्री.सतीश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, , जिल्हा उद्योग केंद्रच्या महाव्यवस्थापक श्रीमती अर्चना कोठारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल सतेश हंगे (नि.) उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पुढे म्हणाले की, सैनिक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करतात. जिल्हा प्रशासनाने ध्वजदिन निधी संकलनात कर्तव्य समजून आपले योगदान देवून त्यांच्या व कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. अनेक कार्यालयाकडून माजी सैनिकांना काही अडचणी आल्यास किंवा कामे होत नसल्यास आमच्या निदर्शनास आणुन द्यावे म्हणजे आम्ही त्यांचे निवारण करु. पुणे जिल्ह्याकरीता ध्वजदिन निधी संकलनाबाबत देण्यात आलेल्या उद्दिष्टपुर्तीसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. येत्या काही दिवसातच दुप्पट म्हणजे ६ कोटीहून अधिक रक्कमेचे ध्वजदिन निधी संकलन होईल, याकामी पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहील, यादृष्टीने काम करावे असे आवाहनही डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

महानगरपालिका आयुक्त श्री.नवल किशोर राम म्हणाले, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाबाबत सर्व नागरीकांनी कृतज्ञता बाळगणे आवश्यक आहे. ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे. त्यांच्या परिवाराच्या मदतीसाठी आपण सर्वांनी मिळून शासनाच्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी मार्फत कृतज्ञता व्यक्त करुया. तसेच त्यांच्या मुलांच्या भवितव्या करिता शासनाकडून रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील याची तजवीज केली जाईल.

जिल्हाधिकारी श्री.जितेंद्र डूडी म्हणाले, माझा देश व नागरिक सुरक्षित राहावे, याभावनेने देशाचे सैनिक देशाच्या सुरक्षितेकरीता आपल्या कुटुंबाला सोडून सीमेचे संरक्षण करीत असतात. देशा प्रती असलेले हे अत्युच्च बलिदान व असिम त्याग यापेक्षा दुसरे कोणतेही नाही. जिल्ह्यात माजी सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. माजी सैनिक व त्यांचे पाल्य वास्तव्य करीत असतात. त्यांच्याकरीता कार्यालये, वसतीगृहे आहेत. माजी सैनिकांच्या पाल्यांना राज्य सरकाच्यावतीने शिष्यवृती देण्यात येते. माजी सैनिकांना सेवानिवृत्तीवेतन अदा करण्यात येते, वीर पत्नींना जमिनी दिल्या जातात, अशा विविध सोई सुविधा यापुढे उपलब्ध करुन त्यांचे पुढील जीवन सुखकर होईल, याकरीता जिल्हा प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील. तसेच जमीनीची प्रलंबित प्रकरणे सोडविण्यात येतील अशी ग्वाही, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. सैनिकांचा आदर करने आपले कर्तव्य समजले पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या सेवेतून आपण आदर्श घेतला पाहिजे, त्यामुळे सर्व कार्यालय प्रमुखांनी आपले कर्तव्य समजून ध्वजदिनात उत्सर्पूतपणे योगदान द्यावे, असे आवाहन श्री. डूडी यांनी केले.

प्रस्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल सतेश हंगे (नि.) म्हणाले, पुणे जिल्ह्याला ध्वजदिन निधी २०२४ करीता २ कोटी ९१ लाख रुपये इतके उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार रु. ३ कोटी ५ लाख ६२ हजार इतके संकलन झाले असून १०५.०२ टक्के इतके उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधीतून माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या विधवा, पाल्यां करिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. ध्वजदिन निधी हा माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठीच खर्च होत असल्याने जिल्ह्यातील सर्व सैनिक संघटनांनी देखील निधी संकलन करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शेवटी कार्यक्रमात गेल्यावर्षी ध्वजदिन निधी संकलनासाठी उत्कृष्ट संकलन केलेल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक व त्यांच्या गुणवंत पाल्यांना शाल व श्रीफळ देऊन विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
0000

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना;15 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ

पुणे दि. 9 डिसेंबर : आंबिया बहार २०२५-२६ मध्ये पुणे विभागात अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यांकरिता संत्रा या पिकासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येतआहे. विमा योजनेत भाग घेण्यासाठी काही तांत्रिक अडचणीमुळे पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर सहभाग होत नव्हता. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता यावे यासाठी संत्रा या पिकासाठी अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यांकरिता सहभागाची मुदत वाढ १५ डिसेंबर, २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. तरी जास्तीजास्त शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे, आवाहन विजयकुमार राऊत अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page