
पुणे राज्यातील शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेचं वाढतं महत्व आणि सक्ती याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जोरदार आवाज उठवला. बालभारती कार्यालयाबाहेर आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करत हिंदी भाषेच्या पाठ्यपुस्तकांवर शाई फेकत निषेध नोंदवला.या आंदोलनादरम्यान पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी छापण्यात आलेल्या हिंदी विषयाच्या पुस्तकांची पानं फाडण्यात आली. या कृतीद्वारे हिंदी भाषेची सक्ती आणि महाराष्ट्रातील मातृभाषा मराठीवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.या आंदोलनाचं नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष धनंजय दळवी यांनी केलं. त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही. महाराष्ट्रात शिक्षणाची प्राथमिक माध्यमं मराठीतूनच असली पाहिजेत. हिंदी भाषेचं वाढतं प्रस्थ हा मराठी अस्मितेवर घाला आहे, आणि आम्ही हे अजिबात सहन करणार नाही.”
बालभारती कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मनसे विद्यार्थी सेनेने राज्य सरकारकडून हिंदी सक्तीविरोधात स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.