
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत असून, आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक तीनपट व नियमित शुल्क भरून राखून ठेवण्याकरीता आगाऊ अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक इच्छुक वाहनधारकांनी दिनांक 08 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यातील अर्ज, डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथील खाजगी वाहन विभागात सादर करावेत. एखाद्या एका क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर अर्जांसाठी लिलावाचे डीडी दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील व त्याच दिवशी दुपारी 4.00 वाजता सभागृहात लिलाव होईल.
त्याचप्रमाणे, दुसऱ्या टप्प्यात आकर्षक व पसंतीच्या क्रमांकांसाठी अर्ज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत. या अर्जांसाठीचे लिलावाचे डीडी दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील व दुपारी 4 वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव आयोजित करण्यात येईल.
लिलावासाठी सादर करण्यात येणारे डीडी हे “R.T.O., Pune” या नावाने नॅशनलाइज्ड/शेड्युल्ड बँकेचे, पुणे येथील असणे आवश्यक असून ते दोन महिन्यांपेक्षा जुने नसावेत. प्रत्येक अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. लिलावासाठी सादर करण्यात येणारा डीडी बंद पाकिटात एका अर्जासोबतच ग्राह्य धरला जाईल. “Pune R.T.O.” या नावाने सादर केलेले किंवा विहित शुल्कापेक्षा कमी रकमेचे डीडी बाद करण्यात येतील. एकाच अर्जदाराने एका क्रमांकासाठी एकाहून अधिक पाकिटे सादर केल्यास संबंधित अर्ज रद्द करण्यात येईल.
लिलाव प्रक्रियेमध्ये एखाद्या पसंतीच्या क्रमांकाला समान रकमेचे डीडी प्राप्त झाल्यास, संबंधित क्रमांकाची निश्चिती अर्जदारांच्या नावांच्या चिठ्या टाकून करण्यात येईल. लिलाव प्रक्रियेदरम्यान अर्जदार उपस्थित असो अथवा नसो, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1981 च्या नियम 540 नुसार पसंतीचा नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याची वैधता 180 दिवस आहे. तथापि, आता NIC Portal मार्फत करण्यात आलेल्या बदलानुसार वैधता संपलेले पसंती क्रमांक पुन्हा जनतेसाठी पोर्टलवर उपलब्ध दिसून येतात.
वरील लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पसंती क्रमांकांचे वितरण ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, नागरिकांनी https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करून, अर्ज व शुल्क भरणा करून पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करता येणार आहे. यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी कळविले आहे.