सासवड :- संत सोपानकाका सहकारी बँक व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थांचे संस्थापक शिक्षणप्रेमी, सहकाररत्न स्व चंदुकाका जगताप यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त पुरंदर – हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या संकल्पेनतून, संत सोपानकाका सहकारी बँकेच्या माध्यमातून,
संत सोपानकाका फाउंडेशनच्या वतीने ५ जिल्हे आणि ५७ तालुक्यांत राबविलेल्या “संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा” या उपक्रमाचा बक्षिस वितरण सोहळा दि ११ जून रोजी सकाळी ठीक १० वाजता सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि पुरंदर – हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
स्वर्गीय चंदुकाका जगताप हे स्वच्छतेचे प्रणेते होते. स्व काकांनी शिक्षण संस्था, बॅक, पतसंस्था तसेच विविध संस्था स्थापन केल्या त्यामध्ये स्वच्छता, प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि प्रगती यावर त्यांचे विशेष लक्ष असायचे. त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कार्याचा आदर्श, शैक्षणिक क्षेत्रात यापुढेही रहावा आणि त्याला चालना मिळावी, ह्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले.
पुणे विभागातील ५ जिल्ह्यातील ५७ तालुक्यांतील सुमारे ३ हजार माध्यमिक विद्यालयांची पाहणी करून आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण, गुणवत्ता, भौतिक सुविधा आदी बाबींची पूर्तता केलेल्या शाळांना सन्मानीत केले जाणार असल्याची माहिती अभियानाच्या संयोजन समितीच्या वतीने प्राचार्य नंदकुमार सागर यांनी दिली.
याबाबत सासवड येथे या अभियानाचे प्रमुख व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आणि या अभियानाच्या संयोजकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली. यामध्ये ही माहिती देण्यात आली.
या अभियानांतर्गत सन २०२३ – २०२४ या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजक व समन्वयक समिती यांनी विभाग व जिल्हास्तरीय शाळांची तपासणी, छाननी करून स्वच्छ व सुंदर शाळांची निवड केली आहे.
सासवड येथील संत सोपानकाका सहकारी बँक आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्हयामध्ये ” संत सोपानकाका सुंदर माझी शाळा ” अभियान राबविण्यात आले होते.
या अभियानाचे विभाग स्तरावरील व जिल्हा स्तरावरील स्वच्छ व सुंदर शाळा पारितोषिक वितरण समारंभ व नवीन शैक्षणिक धोरण याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा ११ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात आयोजित केले आहे असल्याचे समन्वयक समितीचे सदस्य मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे यांनी सांगितले.
याप्रसंगी उपक्रमशील शाळा पुरस्काराने विभागातून ५ शाळांचा विशेष सन्मान होणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले असून अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये रोख सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, शाॅल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तर तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यात प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले असून अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये रोख सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, शाॅल आणि श्रीफळ असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी पुरंदर आणि हवेली तालुक्यातील तालुकास्तरावरील विजेत्या शाळांचाही सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक कुंडलिक मेमाणे यांनी दिली.
तसेच पाचही जिल्ह्यातील तालुकानिहाय पारितोषिक वितरण समारंभ त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. या अभियानात एकूण ३ हजार शाळांनी सहभाग घेतला आहे.
या सोहळ्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया, मुंबई सेकंडरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती प्राचार्य सागर यांनी दिली.
पत्रकार परिषदेला “संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा” अभियानाचे संकल्पक, आमदार संजय जगताप यांसह प्रदीप पोमण, संत सोपानकाका फाउंडेशनचे प्रकाश पवार, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, सतिश शिंदे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे रविंद्रपंत जगताप यांसह समन्वय समितीचे सदस्य कुंडलिक मेमाणे, वसंतराव ताकवले, सुधाकर जगदाळे, रामप्रभू पेटकर, दत्तात्रय रोकडे उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील प्रथम तिन क्रमांकांची विद्यालये पुढीलप्रमाणे :- प्रथम – शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर. द्वितीय – गुरूवर्य रा प सबनीस विद्यामंदिर नारायणगाव ता जुन्नर आणि तृतीय – लक्ष्मणराव आपटे प्रशाला डेक्कन पुणे. उपक्रमशील शाळा – ज्ञानदा प्रशाला किरकटवाडी ता हवेली.