मंत्री चंद्रकांत पाटील : मोदी सरकार पडणार या आशेवरच शरद पवारांचा संघर्ष…

Photo of author

By Sandhya

मंत्री चंद्रकांत पाटील

केंद्रातील सरकार पडणार या आशावादाशिवाय स्वतः आणि इतरांना संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त करता येत नाही. म्हणून शरद पवारांनी असे वक्तव्य केले असेल; पण केंद्रातील मोदी सरकार भक्कम आहे.

राज्यातील शिंदे सरकार पडणार, असेही ते गेल्या दोन वर्षांपासून म्हणत आहेत; पण सरकार पडले नाही. त्यामुळे सरकार पडणार हा त्यांचा आशावाद आहे, अशी टीका उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

तसेच मेहनत उद्धव ठाकरे यांनी घेतली; पण फायदा काँग्रेसला झाला, असे विधानही त्यांनी केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, ‘अटलबिहारी वाजपेयी यांनी २४ पक्षांना घेऊन सरकार चालवून दाखवले. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आशादायक आहे. त्यामुळे हे सरकार स्थिर राहणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत खूप मेहनत घेतली. त्याचा लाभ काँग्रेसला झाला. त्यांच्या जागा वाढल्या. २०१९ च्या तुलनेत ठाकरे यांच्या जागा कमी झाल्या. तसेच विशिष्ट समाजाच्या मतांवर विजय मिळवला हा ठपका पडला. जर युती कायम ठेवली असती तर आज चित्र वेगळे असते.’

मराठा आरक्षणाबद्दल मंत्री पाटील म्हणाले, ‘मराठा समाजाच्या विकासासाठी आम्ही जे केले ते मराठा समाजापर्यंत पोहचवण्यास आम्ही कमी पडलो. जरांगे-पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांना मराठा आरक्षणातील वास्तविकता पटवून देणार आहोत. आंदोलनात १० मागण्या करायच्या असतात. त्यांतील ८ पूर्ण झाल्या की, थांबायचे असते.’ महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे उपस्थित होते.

Leave a Comment