मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहेत. मागच्यावेळी सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने पुन्हा त्यांना आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलं आहे.
परंतु, त्यांच्या आंदोलनाला आता सरकारपक्षाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं दिसतंय. शिंदे गटातील काही नेत्यांनी मनोज जरांगेंनी आता सबुरीने घ्यावं असं म्हटलंय. तर, विधान परिषदेसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.
“भारतीय जनता पक्ष मराठाविरोधात आहेत, हे माझं मत मी सातत्याने मांडलं आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अत्याचार झाला होता. माय माऊलींवर लाठीमार झाला होता. यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून या आंदोलनात हे सरकार आहे. मग वाशीला जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गुलाल का उधळला होता, हा माझा प्रश्न आहे.
गावापासून पायी आलेल्या जरांगे पाटलांना वाशीतच का थांबवलं गेलं? तुम्हाला आरक्षण द्यायचं नव्हतं तर आंदोलन करू द्यायचं होतं. याचा अर्थ तुम्ही दुटप्पी वागत आहात. म्हणून असं वाटतं जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर सरकारने केलाच पाहिजे”, असं अंबादास दानवे म्हणाले.
माझा काटा काढण्याचा प्रयत्न, मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्रांसह ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. ही मागणी घेऊन त्यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले की, “हे सरकार गोड बोलून माझा काटा काढू पाहतंय.”
विधानसभेसाठी तयारी सुरू दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघातील संपर्कप्रमुखांची मोटबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.
आज उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाची बैठक संपन्न झाली, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली. येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होतील त्याबाबत आढावा घेण्यात येत आहे,
लोकसभा निवडणुकीचाही अहवाल सादर केला जाणार आहे. महाविकास आघाडीत त्यांचा विजय आणि पराभव असेल त्यांच्याकडून अहवाल ८ दिवसांत मागवला आहे.
लोकसभेत अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी महाविकास आघाडीत ज्या ठिकाणी उमेदवार होते त्या ठिकाणी काम केले जाणार आहे. तसंच, येणाऱ्या काळात विधानसभेसाठी रणनीती आखण्यासाठी दौराही करण्यात येणार आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले.