40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, काँग्रेसने तेलंगणामध्ये पुरा केला वादा; प्रियंका गांधींनी ट्विट करून दिली माहिती….

Photo of author

By Sandhya

प्रियंका गांधींनी ट्विट करून दिली माहिती

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. “मंत्रिमंडळाने 2 लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील सरकारने 10 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ 28,000 कोटी रुपयांची शेती कर्जे माफ केली होती असे,” त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. या निर्णयानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांचा पक्ष कायम शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित, वंचित आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

रेवंत रेड्डी यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या, “तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पूर्ण करत आमच्या तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्जबाजारी 40 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.”

“देशातील सर्व संपत्ती ही देशातील जनतेची असून ती केवळ लोकांच्या हितासाठीच खर्च झाली पाहिजे, असे काँग्रेसचे मत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचे कर्जही आम्ही माफ केले होते.

केंद्रात आमचे सरकार असताना देशभरातील शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले होते,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. काँग्रेस पक्ष शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित, वंचित आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, कर्जमाफी आणि पात्रता अटींचे तपशील लवकरच सरकारी आदेशात प्रकाशित केले जातील. यापूर्वीच्या केसीआरच्या बीआरएस सरकारने 1 लाख रुपयांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी न केल्याने शेतकरी आणि शेती अडचणीत आल्याचा आरोपही त्यांनी केला.

तेलंगणा मंत्रिमंडळाने 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 दरम्यान घेतलेले कर्ज माफ केले आहे. वारंगल रायथूमध्ये केलेल्या घोषणेनुसार आम्ही आश्वासन पूर्ण केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आम्ही जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे शब्द काळ्या दगडावरील पांढरी रेष असतात. त्यामुळे काँग्रेस जे आश्वासन देते ते पाळते.

Leave a Comment