मनोज जरांगे : “गाफील राहू नका, १३ जुलैपर्यंत ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर…”

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. १३ जुलैपर्यंतची वेळ मनोज जरांगे यांनी सरकारला दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत.

तर ओबीसीतून आरक्षण देण्याला तीव्र विरोध होत असून, लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केले आहे. यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी राज्यातील विविध ठिकाणी सभा, बैठका घेण्यास सुरुवात केली असून, गाफील न राहण्याची सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, येत्या १३ जुलैपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचे आहे, तोवर कुणीही गाफील राहू नका.

सरकारने आपल्याला १३ जुलैपर्यंत आरक्षण दिले नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. सरकारने आरक्षण दिले नाही तर राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे याचा निर्णय लवकरच घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचे आहे. आता आपली लेकरे मोठी करायची आहेत. आपल्या लेकरांना मोठे करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे.

गाफील राहू नका, हा माझा नेता, तो तुझा नेता असा वाद घालत बसू नका. इतकी वर्षे आपल्या नेत्यांना मोठे करत आलो. आता आपल्या मुलांना कसे मोठे करता येईल ते पाहा, असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, मराठा समाजातील लोकांनी १०० टक्के मतदान करावे. आपली एकजूट सर्वांनी पाहिली आहे.

एकजूट कायम ठेवा. आपण आपला विषय मागे पडू द्यायचा नाही. सर्वांना शेवटचे सांगतो की, संपूर्ण ताकदीने एकत्र राहा. आपली शक्ती कमी पडू देऊ नका. सरकारने आरक्षण दिले नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाजाची सर्वांत मोठी बैठक आयोजित करू.

एका विशाल मैदानावर ही बैठक घेऊ. या बैठकीत आपण पुढचे नियोजन करू. या सरकारने आपल्याला आरक्षण दिले नाही तर काय करायचे याचा निर्णय त्या बैठकीत घेऊ. २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे त्याचा निर्णय त्या बैठकीत घेतला जाईल, असे मनोज जरांगे यांनी नमूद केले.

Leave a Comment