पुण्यात झिकाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. खराडी भागातील दोन गर्भवतींना झिकाचा संसर्ग झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी दिली. त्यामुळे रुग्णांची संख्या १८ पर्यंत पोहोचली आहे.
शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून झिका विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यात सर्वाधिक धोका गर्भवतींना आहे. आतापर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांतील १० गर्भवतींना झिका विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान झाले असल्याचेही विभागातर्फे सांगण्यात आले.
झिकाचा रुग्ण आढळलेल्या भागातील गर्भवतींची वैद्यकीय तपासणी करण्यावर आरोग्य विभागाने प्रकर्षाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
झिकाच्या गुरुवारी आढळलेल्या दोन रुग्णांमध्ये एक ३२ वर्षीय आणि दुसरी २५ वर्षीय गर्भवती आहे. त्या दोघीही खराडी भागातील रहिवासी आहे. एक जण २२ आणि दुसरी १८ आठवड्यांची गर्भवती आहे. या दोन्ही गर्भवतींना झिकाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.
खराडीमध्ये एक रुग्ण आढळल्याने या भागात गर्भवतींचे रक्तनमुने तपासण्यासाठी संकलित करण्यात आले होते. त्याअंतर्गत आठ गर्भवतींचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले. त्यातून या दोघींना झिकाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली.
सर्वाधिक रुग्ण एरंडवणे भागात शहरात आतापर्यंत झिकाच्या १८ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यापैकी सर्वाधिक ६ रुग्ण एरंडवणे परिसरात सापडले. त्याखालोखाल पाषाण आणि खराडी परिसरात प्रत्येकी ३ रुग्ण आढळले आहेत.
मुंढव्यात २, डहाणूकर कॉलनी, उजवी भुसारी कॉलनी, आंबेगाव बुद्रुक आणि कळस भागात प्रत्येकी एक रुग्ण आहे. या सर्व रुग्णांवर घरातच उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, रुग्ण आढळलेल्या भागात प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर भर देण्यात येत आहे.
३३३ घरमालकांना दोन लाखांचा दंड झिका विषाणूंचा संसर्ग एडिस इजिप्ती या प्रजातीच्या डासाच्या मादीपासून होतो. त्यामुळे या विषाणूंच्या ससंर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. डासांची पैदास आढळल्याने ३३३ घरमालकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजाविली आहे. त्यांच्याकडून एक लाख ८८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सासवडमध्ये आढळला रुग्ण राज्यात सर्वाधिक झिकाचे रुग्ण पुणे शहरात आढळत आहेत. त्याचबरोबर शहराच्या जवळच्या सासवडमध्येही झिकाचा रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. सासवडमधील ६५ वर्षीय पुरुषाला झिकाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यांना २४ जूनपासून झिकाची लक्षणे दिसत होती. त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
त्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाचा रक्तनमुना तपासणीसाठी २ जुलैला राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आला. त्याचा वैद्यकीय अहवाल बुधवार (ता. ३) मिळाला. त्यांच्या कुटुंबातील कोणामध्येही अद्याप झिकाची लक्षणे नसल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले.