रावसाहेब दानवे : “विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप झाला तर…”

Photo of author

By Sandhya

रावसाहेब दानवे

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतदान फुटण्याचा धोका असून पराभूत कोण होणार? याचा अंदाज आता बांधला जात आहे.

जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. याबरोबरच पसंतीक्रमानुसार मतदान कसे करायचे? याची रणनीती गुरुवारी दिवसभर आखण्यात आली.

या पद्धतीने मतदानापूर्वी तशा सूचनाही आमदारांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज सकाळी ९ ते ४ या वेळेत विधानभवन परिसरात मतदान होणार आहे. त्यानंतर पाच वाजता मतमोजणी होणार आहे.

आता विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाआधी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. “विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही.

पण राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करणार”, असं सूचक विधान रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

“विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार वैगेरे काही होणार नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट असे आमचे सर्वांचे आमदार एकत्र आहेत.

आमचे सर्वच्या सर्व उमेदवार १०० टक्के वियजी होतील. राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करणार, कारण त्यांच्याकडून (विरोधकांकडून) होऊ शकत नाही”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणावरून विरोधकांवर टीका

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, “मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारणाचा विषय होऊ नये. सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र बसून यावर मार्ग सोधला पाहिजे. अशा मताचे आम्ही आहोत. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना आरक्षण दिलं गेलं होतं. मात्र, त्या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं.

त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात आरक्षणाला स्थगिती मिळू दिली नाही. त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाला. पुढे आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला. पण त्यावेळी राज्यात जे कोणी सत्तेत होतं, त्यांनी आरक्षणासाठी वकिलांची फौज आणि त्यासाठी लागणारी माहिती दिली नाही. त्यामुळे ते आरक्षण रद्द झालं”, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर केली.

दानवे पुढे म्हणाले, “राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने आता १० टक्के आरक्षण दिलेलं आहे. यावरही समाजाचे समाधान झालं नसेल तर यावर काय मार्ग निघू शकतो? यासाठी महायुती सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

मला असं वाटतं जेव्हा असे काही प्रश्न निर्माण होतात, तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन ते प्रश्न सोडवले पाहिजेत. पण दोन दिवसांपूर्वी जी बैठक पार पडली, त्या बैठकीला विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. याचा अर्थ त्यांना हे आरक्षण देण्यासंदर्भात आस्था नाही. पण आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत”, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

Leave a Comment