राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विदयापीठ) विद्यापीठाचा 21 वा दीक्षांत समारंभ आज (3 सप्टेंबर, 2024) झाला.
विद्यार्थी आज इतके समर्थ झाले आहेत की आपले व्यक्तिमत्व आणि ज्ञानाच्या जोरावर देशात आणि परदेशात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतात असे राष्ट्रपती यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या. आजचे विद्यार्थी व्यवस्थापन, आरोग्य देखभाल, कायदा, सामाजिक शास्त्र आणि इतर क्षेत्रांमध्ये नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निगच्या माध्यमातून प्रभावी योगदान देऊ शकतात, असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी देशातील विविध धर्म आणि समुदायांच्या संस्कृती आणि त्यांच्या सध्याच्या गरजा जाणून घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. या ज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर, आरोग्यसेवा उत्पादने आणि विपणन धोरणे आखावीत ज्यामुळे समाजातील वंचित घटकांचा आणि प्रत्येकाचाच सर्वांगीण विकास होईल त्याचबरोबर शाश्वततेला प्रोत्साहन मिळेल, असे राष्ट्रपतींनी सांगितले. स्टार्ट-अप इंडिया, स्किल इंडिया, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया यांसारखे उपक्रमही त्यांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करतील, असे त्या म्हणाल्या.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) मध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे 33000 विद्यार्थ्यांपैकी मुले आणि मुलींची संख्या जवळपास सारखी असल्याचे अधोरेखित करून त्यांनी सांगितले की नारी शक्ती ही केवळ नागरिकांच्या अभिमानाचा विषय नसून देशाच्या विकासातील तो एक महत्वाचा घटक आहे. सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठ लैंगिक समानतेला प्राधान्य देत असून मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. सर्व शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या ‘सिम्बायोसिस आरोग्य धाम ‘या उपक्रमाचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठ आपल्या परिसरातील आसपासच्या गावांमध्ये फिरते कुटुंब आरोग्य रुग्णालय चालवत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. अद्ययावत तंत्रज्ञानासोबतच युवा पिढीला मूल्याधारित शिक्षण देणे हे सर्व शैक्षणिक संस्थांचे उद्दिष्ट असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सिम्बायोसिस विद्यापीठाचे प्राध्यापक, सर्व सदस्य आणि माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये अधिकाधिक संशोधनाला चालना द्यावी असे आवाहन त्यांनी केले. वर्षानुवर्षे केलेल्या संशोधनामुळे नवीन गोष्टींचा शोध लागतो आणि समस्यांवर नवीन उपाययोजना मिळतात. भारतातील संशोधक अभ्यासक केवळ देशाच्याच नव्हे तर जगाच्या समस्यांवर उपाय शोधू शकतात. राष्ट्रीय शिक्षण धोरणात देखील संशोधनावर भर देण्यात आला आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. विद्यापीठात जलसंपदा व्यवस्थापन, स्टेम सेल, नॅनोसायन्स आणि हवामान बदल यांसारख्या इतर अनेक विषयांवर बहु-विद्याशाखीय संशोधन केंद्रे कार्यरत आहेत हे पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यात उत्कृष्टता साध्य करावी असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. उत्कृष्टतेचा ध्यास घ्या आणि यश आपोआप प्राप्त होईल ही म्हण विद्यार्थ्यांनी ऐकलीच असेल, बरेचदा काही लोक अधिक पैसे, मोठे घर, मोठी गाडी आणि इतर वस्तुंना यश समजतात. मात्र आजचे विद्यार्थी यशाचा खरा अर्थ समजून घेतील आणि असे कार्य करतील ज्यामुळे इतरांचे राहणीमान सुधारेल, असे त्या म्हणाल्या.