मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, तुरुंगात टाकू…

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देऊन लाखो महिलांना शासनाने मोठा दिलासा दिला. आता ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे.

परंतु, त्याचबरोबर या योजनेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत असे गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 

खारघर शहरातील महिला पुजा प्रसाद महामुनी यांचा या योजने अंतर्गत अर्ज भरत असताना त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून साताऱ्यामधील जाधव नामक तिऱ्हाईत व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे या योजनेचा लाभ घेतला असल्याचे सामोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल ३० अर्ज भरल्याचे दिसून आले. तसेच या योजनेतून ७६ हजार रुपये गैरप्रकार करत वळते करून घेतल्याची बाब समोर आली. यानंतर एकच खळबळ उडाली. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट इशारा दिला आहे. 

लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या योजनेत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी आहे.

यात कोणीही भ्रष्टाचार केला, तर तो खपवून घेतला जाणार नाही. आरोपींना थेट तुरुंगात टाकले जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.  दरम्यान, शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. मालवणमध्ये झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. शिवरायांचा आदर्श ठेवून आपण राज्यकारभार करत असतो. त्यामुळे यावरून राजकारण करणे दुर्दैवी आहे.

नुकतेच जोडे मारो आंदोलन झाले. यावेळी कुणी कुणाचे जोडे हातात घेतले होते, ते कळलेच नाही, घरात बसलेले लोकही रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्त्यावर येऊन दुसऱ्यांचे जोडे हातात घेतले, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.  

Leave a Comment