
मुंबई दि.१९ ऑगस्ट – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. यासंदर्भात आपण पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. याप्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत,अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे असून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास वेगाने सुरू आहे.या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, अशी विशेष विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करतानाच लवकरच स्वतः पिंपळवंडीतील पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
