‘रतन टाटा यांना भारतरत्न द्या’, शिवसेना नेत्याची मागणी; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र…

Photo of author

By Sandhya

रतन टाटा

उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी यांचे बुधवारी 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्माशनभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. यातच आता शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी रतन टाटांना भारतरत्न द्या, अशी मागणी केली आहे.

राहुल कनाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून रतन टाटा यांचे नाव भारतरत्नसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी भारतीय व्यवसाय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्ती रतन टाटा यांच्या निधनाप्रती दुःख व्यक्त केले आहे.

राहुल कनाल यांनी पत्रात काय लिहिले ? रतन टाटा हे केवळ दूरदृष्टी असलेले उद्योजकच नाही तर एक दयाळू व्यक्तीमत्त्वही होते. त्यांच्या पशूप्रेमाची सर्वांनाच कल्पना आहे. त्यांनी लाखो भटक्या श्वानांची मदत करत त्यांना नवं जीवन दिले होते. त्यासोबच त्यांनी गरजूंसाठी कॅन्सर रुग्णालय उभारले.

रतन टाटा यांनी समाजातील अनेक घटकांना निस्वार्थीपणाने मदत केली. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत भरीव योगदान केले आहे. त्यांच्या या योगदानाच्या आधारावर भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कारासाठी रतन टाटांच्या नावाची शिफारस करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करत आहे.

रतन टाटा यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केल्याने असंख्य लोकांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत सकारात्मक योगदान देण्यासाठीची प्रेरणा मिळेल. माझा विश्वास आहे की , आपल्या समाजात परोपकार आणि करुणा ही संस्कृती वाढवण्यासाठी अशा असामान्य व्यक्तींचा सन्मान करणे आवश्यक आहे. त्यामुळे माझी ही विनंती विचारात घ्यावी, असे राहुल कनाल यांनी पत्रात नमूद केले आहे.

पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कराने सन्मानित रतन टाटा यांना 2000 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन सन्मानित केले होते. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित केले. रतन टाटा यांना भारतरत्नने सन्मानित करण्याची मागणी याआधी देखील करण्यात आली आहे.

रतन टाटा यांच्यावर वरळीत अंत्यसंस्कार रतन टाटा यांच्या पार्थिवाचे सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए या ठिकाणी अंत्यदर्शन घेता येईल. यानंतर दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल.

संध्याकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोडवरुन त्यांची अंत्ययात्रा वरळीतील स्मशानभूमीत पोहचेल आणि सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाईल.

Leave a Comment