दिवंगत उद्योगपती रतन टाटा महाराष्ट्रात उद्योग आणणार होते. पण भाजप आणि राज्य सरकारने हे उद्योग गुजरातमध्ये नेले, असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मंगळवारी बारामती येथे केला होता.
शरद पवार यांच्या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरुन प्रत्युत्तर दिले आहे. या वयात इतके खोटे बोलायचे नसते, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ज्यांच्या काळात गुंतवणूक आणण्यात कधी गुजरात तर कधी कर्नाटक नंबर 1 वर होते, ते आज महाराष्ट्र क्रमांक 1 वर आल्यावर जरा अधिकच अस्वस्थ झालेत, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
टाटा एअरबस, फॉक्सकॉन असो, किंवा अन्य प्रकल्प सातत्याने खोटे बोलून मविआच्या नेत्यांनी दिशाभूल केली. सॅफ्रॅनच्या बाबतीत तर कहरच केला होता.
कंपनीने 2 मार्च 2021 लाच हैदराबादेत त्यांच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. पण, आमचे सरकार आल्यावर तोही प्रकल्प गुजरातला गेल्याची आरोळी उठवली गेली, असेही फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर महाराष्ट्रात आलेल्या विविध प्रकल्पांविषयीच्या वृतांचे कात्रण आणि काही लिंक देखील शेअर केल्या आहेत.