भाजपचा अजेंडा ‘बटेंगे तो कटेंगे’ नव्हे तर ‘हम महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे’, असा आहे. नीतिमत्ता गहाण ठेवून महाराष्ट्रात सत्तेत आलेले राज्यातील भ्रष्ट सरकार गाडण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात उतरली असून, सामान्य जनभावना या सरकार विरोधात आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जीवनावश्यक पाच वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील, अशी ग्वाही उद्धवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी बुधवारी येथे दिली.
दर्यापूर येथे बसस्थानक चौकातील धर्माधिकारी कन्या शाळेच्या पटांगणात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफीसह महिलांना तीन हजार रुपये, तर बेरोजगारांना चार हजार रुपये महिना आमचे सरकार देणार आहे. विविध उद्योगांना महाराष्ट्रातील विविध प्रांतात स्थापन करून बेरोजगारी नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना लढवित असून, यावेळी विजय हमखास असा विश्वाससुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दर्शविला.
यावेळी मंचावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी खासदार अनंत गुढे, रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची वलगाव आणि बडनेरा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेण्यात आली.
उद्धवसेनेचा पंचसूत्री वचननामा, २५ लाखांपर्यंत मोफत उपचारमुंबई – महाविकास आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्या जाहीरनाम्याशी आम्ही सहमत आहोत.
मात्र, शिवसेनेची काही वचने आहेत. ती सरकार आल्यानंतर पूर्ण केली जातील. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार, हे आमच्या जाहीरनाम्यात असल्याचे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले.
‘मातोश्री’वर उद्धवसेनेचा पंचसूत्री वचननामा गुरुवारी प्रसिद्ध केल्यानंतर ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राला जी आश्वासने दिली होती ती आम्ही पूर्ण करून दाखवली आहेत. आताही जे करणार आहोत तेच आम्ही बोलतो आणि जे बोलतो ते आम्ही करतो. राज्यातील बेरोजगारी दूर करणे, भूमिपुत्रांना नोकरी देणार आहोत.
वचननाम्यात काय?- प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर-गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर या ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार- प्रत्येक पोलिस ठाण्याबरोबर स्वतंत्र महिला पोलीस ठाणे सुरु करणार-प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट-जात, पात, धर्म, पंथ न पहाता महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण-सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना -जातनिहाय जनगणना करणार.-धारावीकरांना उद्योगांच्या सोयींसह राहते घर देणार.-रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र उभारणार-बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करणार.