शरद पवार : सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील…

Photo of author

By Sandhya

शरद पवार

महाराष्ट्रात व केंद्रात असणारे सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. यामुळे महाराष्ट्राचे हित जपण्यासाठी सत्ता परिवर्तनाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. मोरगाव येथे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, केवळ शेतीवर प्रपंच चालवणे अशक्य आहे. यामुळे आमचे सरकार असताना शैक्षणिक संकुलाबरोबर एमआयडीसी काढल्या. शेतीला हातभार लावण्यासाठी घराण्यातील एक व्यक्ती शेती, तर दुसरा व्यक्ती नोकरी करू लागला. कुरकुंभ, बारामती, इंदापूर, रांजणगाव, शिरवळ येथे कारखाने काढले.

त्यातून अनेक लोकांच्या हाताला काम मिळाले. मात्र, सध्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, शेतीसाठी पाणी नाही, शेतीसाठी लागणारी खते, औषधी यांचे भरमसाठ वाढलेले दर व युवा पिढीची बेरोजगारी, असे असंख्य प्रश्न महाराष्ट्रामध्ये भेडसावत आहेत. यामुळे महाराष्ट्राची सत्ता बदलणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांच्या मुलाच्या हाताला काम व शेतीला योग्य भाव मिळण्यासाठी सत्ता परिवर्तन झाले पाहिजे. गेल्या लोकसभेमध्ये काही लोक धमकावत होते. मात्र, धमक्यांना भीक न घालता सुप्रिया सुळे यांना मताधिक्याने निवडून दिले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सत्ता पलटवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

राजकारणाची सुरुवात करताना १९६७ साली मी पहिल्यांदा मोरगाव येथे मयुरेश्वराच्या दर्शनासाठी आलो होतो. नंतर जाहीर सभा सुरू केल्या. मला आठवत आहे, त्यावेळेस मला सांगितले होते की मयुरेश्वराचे दर्शन करा व येथून प्रचाराची सुरुवात करा, तुमचे यश मात्र हमखास होणार.

यानंतर मला अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा मोरगाव येथे पहिली प्रचार सभा घ्यावी वाटली. १९६७ सालची पुनरावृत्ती होण्यासाठी युगेंद्रच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे. अमेरिकेत शिक्षण घेतलेला उच्चशिक्षित उमेदवार युगेंद्र पवार यांना आपण निवडून द्या, असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

Leave a Comment