स्वारगेट | पुण्यात स्वारगेट पोलिसांची मोठी कामगिरी

Photo of author

By Sandhya

स्वारगेट:

पुण्यात स्वारगेट पोलिसांनी जैन मंदिरांमध्ये साधकाच्या वेशात चोरी करणाऱ्या आरोपीला जेरबंद केलं आहे. विशेष म्हणजे, या आरोपीने पुण्यातीलच नव्हे तर मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागांतील मंदिरांमध्येही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याचं तपासात उघड झालं आहे.

दि. १५ नोव्हेंबर रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात एका जैन मंदिरातील देवाचे सोन्याचे मुकुट आणि सोन्याची चेन चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. ही चोरी जय परेश पारेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आली. याच दिवशी शहरातील इतर तीन ते चार जैन मंदिरांमध्येही चोरीचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं होतं.

स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आलं. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. तपासादरम्यान, आरोपी मुंबईतील गिरगाव भागात राहत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गिरगाव येथून नरेश आगरचंद जैन याला ताब्यात घेतलं.

आरोपीने तपासादरम्यान पैशाच्या चणचणीमुळे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले ४,२०,००० रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. तपासात आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचं स्पष्ट झालं असून, तो यापूर्वी घाटकोपर, वाई, चिखली, डोंबिवली आदी भागांतील मंदिरांमध्येही चोरी करत असल्याचं उघड झालं आहे. आरोपी मंदिरांमध्ये जैन साधकाच्या वेशात जाऊन देवाचे दागिने चोरण्याचं काम करत असे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक तानवडे, पोलीस हवालदार सागर केकाण, शंकर संपते, रफिक नदाफ, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे आणि पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे.

जर कोणाच्या मंदिरात अशा प्रकारच्या चोरीचे प्रकार घडले असतील तर त्यांनी तातडीने स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी केलं आहे.

Leave a Comment