Headlines

चाकण शहरात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर,.रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी,.

औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण शहरात स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद हद्दीतील विविध भागांमध्ये रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत तसेच उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार घडत असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
या प्रकारांची गंभीर दखल घेत चाकण नगरपरिषदेने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असताना नागरिकांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
चाकण शहरातील विविध भागांमध्ये घरगुती कचरा संकलित करण्यासाठी नगरपरिषदेची घंटागाडी नियमितपणे फिरत असते. नागरिकांनी घरातील ओला व सुका कचरा घंटागाडीतच द्यावा. यासाठी प्रशासनाकडून जनजागृतीही केली जाते. मात्र, काही नागरिकांकडून या सूचनांकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरून दुर्गंधी निर्माण होण्याबरोबरच डासांची उत्पत्ती आणि विविध आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
घंटागाडी उपलब्ध असतानाही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची प्रवृत्ती थांबविणे आवश्यक आहे. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ नगरपरिषदेची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून दुसऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्याची भूमिका नगरपरिषदेने घेतली पाहिजे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तथा नगरसेविका रूपाली कांडगे यांनी सांगितले की,” स्वच्छतेबाबत नागरिकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. शहरातील महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ परिसर असणे अत्यंत आवश्यक आहे.”
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची सवय सोडून प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.
उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर यापुढे नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल. घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करून तो केवळ घंटागाडीतच द्यावा. एखाद्या परिसरात घंटागाडी वेळेवर येत नसेल किंवा कचरा संकलनाबाबत काही अडचण येत असेल, तर संबंधित नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाशी किंवा आमच्याशी संपर्क साधावा. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी भूमिका रूपालीताई कांडगे यांनी मांडली.
‘स्वच्छ चाकण, सुंदर चाकण’साठी नागरिकांची साथ महत्त्वाची आहे.
शहरातील स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी केवळ स्वच्छता कर्मचारी आणि घंटागाड्यांवर अवलंबून राहून चालणार नाही, तर नागरिकांनीही सार्वजनिक स्वच्छतेचे भान ठेवणे आवश्यक आहे. घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा रस्त्यावर न टाकणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे आणि नगरपरिषदेच्या नियमांचे पालन करणे या साध्या गोष्टींमधून शहराच्या स्वच्छतेत मोठा बदल घडू शकतो.

शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची, तर स्वच्छता जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.

” चाकणला स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली, तरच चाकण शहराला स्वच्छतेच्या बाबतीत नवी ओळख मिळू शकेल.” – मंगेश कांडगे, नगरसेवक, चाकण.