



सासवड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक मनोहर ज्ञानोबा जगताप यांची निवड करण्यात आली आहे. याच सभेत स्वीकृत नगरसेवकपदी भाजपच्या वतीने मयूर चंद्रकांत चौखंडे आणि शिवसेनेच्या वतीने सचिन दामोदर भोंडे यांची निवड जाहीर करण्यात आली. शुक्रवारी (ता. ९) नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
निवडणूक प्रक्रिया आणि निकाल
उपनगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून मनोहर जगताप तर विरोधी शिवसेनेकडून प्रितम म्हेत्रे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मतदान घेण्यात आले. हात उंचावून केलेल्या या मतदानात मनोहर जगताप यांना १४ तर प्रितम म्हेत्रे यांना ९ मते मिळाली. जगताप यांच्या अर्जावर ज्ञानेश्वर जगताप यांनी सूचक म्हणून तर सोपान रणपिसे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा परिचय
मनोहर जगताप (उपनगराध्यक्ष): प्रभाग एक ब (सर्वसाधारण) मधून सलग तीन वेळा निवडून आलेले ते अनुभवी नगरसेवक आहेत. यापूर्वीही त्यांनी उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.
मयूर चौखंडे (स्वीकृत नगरसेवक – भाजप): युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले चौखंडे हे शिवस्मृती प्रतिष्ठान व राष्ट्रध्वज समितीचे सदस्य आहेत. त्यांनी नुकतीच प्रभाग ५ मधून निवडणूक लढवली होती.
सचिन भोंडे (स्वीकृत नगरसेवक – शिवसेना): भोंडे हे देखील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते असून, यापूर्वी त्यांनी जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे.
या निवडीच्या वेळी माजी आमदार संजय जगताप, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, सत्ताधारी गटनेते अजित जगताप आणि विरोधी गटनेते मंदार गिरमे प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेला नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, बाळासाहेब भिंताडे, सोपान रणपिसे, राजन जगताप, वैभव टकले, प्रितम म्हेत्रे, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर गिरमे यांच्यासह नगरसेविका माधुरी राऊत, लिना वढणे, शितल भोंडे, स्मिता सुहास जगताप, रत्ना म्हेत्रे, अर्चना जगताप, स्मिता उमेश जगताप, दिपाली जगताप, प्रियांका जगताप, शिल्पा जगताप आणि हेमलता इनामके उपस्थित होत्या.
तसेच माजी उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, यशवंतराव जगताप, संजय ग. जगताप, संदीप जगताप, विजय वढणे, पालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख आणि सासवड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष मनोहर जगताप म्हणाले की, “दिवंगत लोकनेते चंदूकाका जगताप यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, माजी आमदार संजय जगताप आणि नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मी यापूर्वीही काम केले आहे. आताही सर्व सदस्यांना सोबत घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन.”
माजी आमदार संजय जगताप यांनी तिन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.